होम क्वारंटाईन शिक्का मारलेले मोकाट

पाटण तालुक्यातील स्थिती ः कारवाईची मागणी

पाटण (प्रतिनिधी) – लॉकडाऊन शिथीलतेने पाटण तालुक्यात खरेदीसाठी मोठी गर्दी होऊ लागली आहे. पाटण शहरात तर आता दररोजच आठवडी बाजार भरू लागला आहे. या गर्दीचा फायदा घेत हातावर होमक्वारंटाइनचे शिक्के मारलेले अनेक लोक बाजारात खुलेआम फिरताना दिसत आहेत. या प्रकारामुळे करोनाचा फैलाव होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यांच्यामुळे आरोग्य धोक्यात येण्याची भिती निर्माण झाल्याने प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.

पाटण तालुकातंर्गत अनेक लोक आपल्या मूळ गावात परतत आहेत. त्यांना होम क्वारंटाइन बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय अन्य राज्य, जिल्ह्यातून येताना संबंधितांची आरोग्य तपासणी व अधिकृत परवाने असल्याशिवाय त्यांना तालुक्यात प्रवेश दिला जात नाही. तालुक्यात येणाऱ्यांनी आपली माहिती स्थानिक प्रशासनाला देवून त्याची अधिकृत नोंद व हातावर शिक्का मारून होम क्वारंटाइन होणे त्यांच्यावर बंधनकारक करण्यात आले आहे. इतर राज्य व अन्य जिल्ह्यातून पाटण तालुक्यात येणाऱ्यांची संख्या काही हजारात आहे. चोरीछुपे येणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. असे असताना कोणी बेकायदेशीरपणे तालुक्यात आला तर संबधितांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

मात्र, सध्या लॉकडाऊन मधील शिथीलतेमुळे पाटणसह तालुक्यातील बहुतांशी बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. या गर्दीत ज्या लोकांच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारून करण्यात आले आहे, असे लोकही बिनधास्तपणे फिरत आहेत. त्यांच्यामुळे करोनाचा फैलाव होऊ शकतो. अशावेळी एक रुग्ण जरी सापडला तरी बधितांची भलीमोठी साखळी निर्माण होऊ शकते. त्यामुळे पाटण तालुक्याचा वनवासमाची पॅटर्न होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.