होम क्वॉरंटाइन ठरताहेत ‘सुपर स्प्रेडर’

आजार लपवून करोनाबाधितांचा सगळीकडे वावर; प्रशासनाचे दुर्लक्ष

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराधीन रुग्णांची संख्या तब्बल 14 हजारांच्या पुढे गेली असून त्यापैकी 11 हजार 800 नागरिक होम क्वॉरंटाइन असल्याने हे बाधित नागरिकच “सुपर स्प्रेडर’ ठरू लागल्याची बाब समोर आली आहे. होम क्वॉरंटाइनमध्ये असलेल्या नागरिकांवर पालिकेचे कोणतेच नियंत्रण नसल्याने बाधितांमधील सौम्य लक्षणे असलेले अनेकजण आजार लपवून खुलेआम वावरत असल्याने बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस भरच पडेल, अशी भीती व्यक्त होत आहे.

नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्यांत करोनाच्या रुग्णांच्या घटलेल्या संख्येमध्ये फेब्रुवारीच्या मध्यापासून वाढ होऊ लागली आहे. मार्चच्या 15 तारखेपासून शहरात करोना बाधितांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. दैनंदिन बाधितांची संख्या दीड हजारांच्या पुढे गेल्याने शहरातील स्थिती अतिशय गंभीर बनली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या करोना बाधितांच्या संख्येनंतरही अनेकांना त्याचे गांभिर्य नसल्याचेही समोर येत आहे. कोविड केअर सेंटरमध्ये सुरुवातीच्या काळात झालेल्या अनेक गडबडींमुळे सध्या पालिका प्रशासन हे सेंटर सुरू करण्यासाठी अतिशय जबाबदारीने पाऊले उचलत असल्याने कोविड सेंटर सुरू करण्यात विलंब होत आहे.

होम क्वॉरंटाइन असलेल्या संख्येमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. शहरात सरासरी बाधितांची संख्या एक हजाराच्या आत असताना कोविड केअर सेंटरची संख्या 30 च्या आसपास होती. सध्या दीड हजारांच्या पुढे दैनंदिन बाधितांची संख्या गेलेली असताना केवळ दोनच कोविड केअर सेंटर सुरू आहेत. घरकुल आणि बालनगरी येथे पालिकेने कोविड सेंटर सुरू केले असले तरी दोन्ही ठिकाणची संख्या कमी असल्याने होम क्वॉरंटाइन होण्याचे प्रमाण मोठे आहे.

झोपडपट्टी आणि दाट लोकवस्तीमध्ये रहात असलेल्या नागरिकांचे बाधितांमधील प्रमाण वाढत असतानाच हे नागरिकही होम क्वॉरंटाइन होत असल्याने त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांचीही बाधितांमध्ये भर पडत आहे. शहरात सध्या उपचाराधीन असलेल्या करोना बाधितांची संख्या 14 हजार 35 वर पोहोचली आहे. त्यापैकी गंभीर आजार असलेल्या रुग्णांवर पालिकेच्या विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर इतरांना होम क्वॉरंटाइनचा सल्ला दिल्याने होम क्वॉरंटाइन असलेल्या रुग्णांची संख्या 11 हजार 800 इतकी झाली आहे. करोनाला अटकाव करण्यासाठी पालिकेने होम क्वॉरंटाइन लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची गरज आहे.

राजरोसपणे वावर
करोनाची बाधा झालेले मात्र गंभीर लक्षणे नसलेले अनेकजण राजरोसपणे वावरत असल्याचेच समोर येत आहे. महापालिकेचा एक ठेकेदारही बाधित असताना पालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये फिरत असल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता.

शहरातील “बेड’ हाऊसफुल
पिंपरी-चिंचवड शहरातील कोविडसाठी राखीव असलेले “आयसीयू’चे जवळ-जवळ सर्वच “बेड’ फुल झाल्याचे पालिकेच्या डॅशबोर्डवर दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी केवळ 85 बेड शिल्लक होते. पुढील आठवड्यात गंभीर आजार असलेल्या करोना बाधित रुग्णांची संख्या वाढ झाल्यास अडचण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे जम्बो कोविड रुग्णालय केव्हा सुरू होणार याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.