तालुक्यात जमावबंदीची काटेकोर अंमलबजावणी
जुन्नर – शासनाने जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या संचारबंदीची अंमलबजावणी जुन्नर तालुक्यामध्ये काटेकोर पद्धतीने सुरू आहे. आरोग्य खाते, प्रशासन आणि पोलिस यंत्रणा आपले काम चोखपणे बजावत असल्याचे चित्र आहे. गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये शहरातून तालुक्यातील अनेक गावांमध्ये नागरिक आलेले आहे. हे नागरिक दवाखान्यांमध्ये गर्दी करत असल्याचे दिसत आहे. मात्र ही दवाखान्यातील गर्दी डोकेदुखीचे कारण होण्याची शक्यता वैद्यकीय व्यावसायिक वर्तवत आहेत.
तालुक्यात १८००० होम क्वारंटाईन तर ६९ विदेशवारी केलेले-
तालुक्यामध्ये सुमारे ६९ लोकांना होम कोरोंटाईन करण्यात आले असून यावर आरोग्य आणि पोलिस विभागाची करडी नजर आहे. तर पुणे-मुंबई आदी करोना संसर्ग झालेल्या शहरातून सुमारे १८००० नागरिक तालुक्यात दाखल झाले आहेत. त्यांनाही होम क्वारंटाईन करण्यात आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश गोडे यांनी सांगितले. दुसरीकडे विविध दवाखान्यातील स्टाफ करोना भीतीमुळे कामावर येण्यास टाळाटाळ करत असून यामुळे रुग्णांना सुविधा देण्यास अडचणी येत असल्याचे डॉ. राहुल पवार यांनी सांगितले आहे. त्याकरिता त्यांना एकाआड दिवस बोलवण्याबाबत संघटनेत निर्णय होत आहे. तर दवाखान्यांमध्ये तातडीची शस्त्रक्रिया वगळता सर्व शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याचे डॉ. सागर शिंदे यांनी सांगितले आहे.
या संकटकाळात किराणा, दूध व मेडिकल्स सुरू असून ते मोठी जोखीम घेऊन जबाबदारी पार पाडत असल्याचे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष कन्हैया खोत यांनी सांगितले. मात्र काही दुकानातील कामगारच कामावर येण्यास तयार नसल्यामुळे ग्राहकांना खूप वेळ थांबावे लागत आहे. बाहेर गावांतून येणारी ही मुले पोलिसांचा प्रसाद तसेच करोनाच्या भीतीमुळे येत नसल्याचे चित्र आहे.
२१ दिवस कुटुंबासोबत-
करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने २१ दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. मात्र ह्या संकटातही एक प्रकारची संधी मिळाल्याचे अनेकांना वाटत आहे. ह्या आशयाच्या विविध पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आणखीन जवळून जाणण्याची संधी या करोनामुळे मिळाल्याचे अनेकांनी सांगितले आहे. त्यांच्यासोबत पत्ते, कॅरम, बुद्धिबळ आदी घरातील खेळ मुलांसोबत सुरू असून टीव्हीसमोर बसून विविध पदार्थांवर ताव मारण्याचा आनंद काही जण लुटत आहेत. काही जणांनी तर ऑनलाईन कोर्स, नवनवीन पुस्तके वाचणे, इंटरनेटवरील विवीध माहिती संकलन आदींमध्ये रमल्याचे सांगत आहेत. तर काही गृहिणींनी दिवाळीची साफसफाई आत्ताच सुरू केल्याचे पोस्ट केले आहे.