Maharashtra Home minister – महाराष्ट्राचं गृहमंत्रीपदावरून महायुतीत रस्सीखेच सुरु आहे. गृह खातं शिवसेनेच्या वाटेला यावं, यासाठी एकनाथ शिंदे आग्रही आहेत. याचदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचं विधान केलं आहे. आम्हा तिन्ही पक्षांना जास्तीत जास्त मंत्रिपदं मिळावीत असं वाटतं. जेव्हा एखाद पक्ष चालवायचा असतो तेव्हा नेत्यांना संतुष्ट करावं लागतं. त्यामुळे खातेवाटपावर आमची चर्चा चालू आहे. आमची ही चर्चा आता जवळ-जवळ संपत आली आहे.
गृहखातं, महसूल या खात्यांना थोडं महत्त्व असतं. आमच्या महायुतीत तीन पक्ष आहेत. या तिन्ही पक्षांना योग्य तो सन्मान देण्यात आला आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं. तसेच गृहखातं तुमच्याकडेच असेल का? या प्रश्नावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी स्मितहास्य केलं आणि याबाबत जेव्हा निर्णय होईल तेव्हा मी तुम्हाला सांगेन, असं उत्तर दिलं.
नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार –
नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. सर्व मंत्र्यांच्या कामाचं मुल्यांकन करुन निर्णय घेतला जाईल, तिन्ही पक्षांना मंत्रिपदं द्यायची असल्यानं काही प्रमाणात मागे पुढे होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उद्या महायुतीच्या नेत्यांची बैठक –
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उद्या महायुतीच्या नेत्यांची बैठक असल्याचंही समोर आलं आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली असून यामध्ये 7 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रिपदाचे चेहरे निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे. याचदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेकडून मंत्रिपद देताना कठोर निकष लावणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.