आता गृहमंत्र्यांच्या गच्छंती होणार?

अनिल देशमुख यांनी घेतली शरद पवारांची भेट

नवी दिल्ली  -राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरून सध्या महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडल्याचे चित्र दिसून येत आहे. मुंबईतील हाय प्रोफाइल परिसरात स्फोटकांसह आढळलेली गाडी आणि त्यानंतर मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे एपीआय सचिन वाझे यांना अटक झाली. या प्रकरणावरून मुंबई पोलीस आयुक्तांची उचलबांगडीनंतर आता थेट गृहमंत्र्यांच्या गच्छंती होणार असल्याची चर्चा आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज नवी दिल्ली येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीत पवार यांनी मुंबईतील घडामोडींबाबत गृहमंत्र्यांकडून सविस्तर माहिती घेतली. तसेच पोलीस यंत्रणेकडून झालेल्या कारभाराबाबत शरद पवार यांनी गृहमंत्र्यांना जाब विचारल्याचे समजते.

या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना अनिल देशमुख म्हणाले, मुंबईत सध्या घडत असलेल्या घडामोडींची शरद पवार यांनी माहिती घेतली. तसेच एनआयए आणि एटीएस करत असलेल्या तपासाला राज्य सरकार पूर्ण सहकार्य करत आहे. योग्य दिशेने तपास सुरू असून जो कोणी दोषी असेल, त्यांच्यावर राज्य शासनाकडून कारवाई करण्यात येईल. पण जोपर्यंत एनआयएचा अहवाल आणि चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत सांगता येणार नाही. रिपोर्ट आल्यानंतर त्यातून ज्या काही गोष्टी समोर येतील त्यानुसार कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

सचिन वाझे प्रकरणावरून शरद पवार हे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीकडून गृहमंत्रिपदासाठी नवीन चेहऱ्याचा शोध घेतला जात आहे. यासाठी आता शरद पवार पुन्हा आपल्या धक्‍कातंत्राचा वापर करणार असल्याचीही माहिती समोर येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.