पाचपुते, नागवडे, जगताप, पोटे उतरल्या रिंगणात
समीरण बा. नागवडे
श्रीगोंदा -स्वतःकडील पदाला न्याय देण्यासोबतच तालुक्यातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावताना नेतेमंडळींची दमछाक होते. या नेतेमंडळींचे “गृहमंत्री’ सक्रिय झाल्याने नेतेमंडळींचा कार्यक्रमांचा भार काहीसा हलका झाला आहे. राजकीय मंडळींनी विकासकामे करण्यापेक्षाही तालुक्यातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणे काहींना महत्वाचे वाटते. नेत्यांनीही मतदार – कार्यकर्त्यांची अपेक्षा ओळखून जास्तीत जास्त कार्यक्रमांना हजेरी लावण्याचा सपाटा लावला आहे. परंतु, राजकीय अथवा संस्थात्मक पदांच्या जबाबदाऱ्या पार पाडतानाच तालुक्यातील सामाजिक व कौटुंबिक कार्यक्रमांना हजेरी लावताना नेत्यांची चांगलीच दमछाक होते.परिणामी या नेत्यांच्या “गृहमंत्र्यां’नी सक्रिय होत आपल्या पतीराजांचा भार हलका करण्याचे काम केले आहे. जिल्हा बॅंकेच्या संचालिका अनुराधा नागवडे ह्या जवळपास गेल्या पंधरा वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत.
त्या सक्रिय असल्याने नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांचा कार्यक्रमांचा भार कमी होत आहे. परिक्रमा संकुलाच्या अध्यक्षा प्रतिभा पाचपुते ह्या जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांचा तालुक्यात संपर्क तुरळक होता. परंतु, आमदार बबनराव पाचपुते यांचा प्रकृतीच्या कारणाने जनसंपर्क घटला आहे. त्यामुळे प्रतिभा पाचपुते ह्या तालुक्यात सक्रिय झाल्या असून त्या सर्व राजकीय – सामाजिक कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. माजी आमदार राहुल जगताप हेही यापूर्वी एकटेच जनसंपर्क ठेऊन होते.
आता त्यांच्या पत्नी डॉ. प्रणोती ह्या सक्रिय झाल्या असून त्या तालुक्यातील बहुतांश कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांचा जनसंपर्क कमी झाल्यानंतर त्यांच्या पत्नी नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांनी ती उणीव भरून काढली आहे. त्यांचे कार्यक्षेत्र श्रीगोंदा शहरापूरते मर्यादित असतानाही त्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून तालुक्यात संपर्क ठेवून आहेत. अनुराधा नागवडे, प्रतिभा पाचपुते, डॉ. प्रणोती जगताप व शुभांगी पोटे या चारही महिलांनी सक्रिय होत जनसंपर्क वाढवला आहे. त्यांच्या सक्रिय होण्याने अनुक्रमे राजेंद्र नागवडे, आ. बबनराव पाचपुते, राहुल जगताप व मनोहर पोटे या नेतेमंडळींना काहीशी उसंत मिळत आहे.
सुवर्णा पाचपुतेंचा दांडगा जनसंपर्क!
भाजप महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस सुवर्णा पाचपुते यांनी जनसंपर्क कधीही कमी होऊ दिला नाही. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ दांडग्या जनसंपर्काच्या जोरावर त्यांनी आपले राजकीय अस्तित्व निर्माण केले आहे. मावळत्या जिल्हा परिषद सदस्या पंचशीला गिरमकर आणि पंचायत समिती सदस्या कल्याणी लोखंडे यांनीही त्यांच्या कार्यक्षेत्रात चांगला जनसंपर्क ठेवला आहे.