नवी दिल्ली – संपूर्ण वैद्यकीय तपासणीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आज “एम्स’मध्ये पुन्हा दाखल करण्यात आले. उद्यापासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वीच शहा यांना ‘एम्स’मध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना तेथे 1-2 दिवस ठेवले जाईल, असे ‘एम्स’च्यावतीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
कोविड-19 ची लागण झाल्यामुळे अमित शहा यांना 2 ऑगस्ट रोजी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दोनच आठवड्यांपूर्वी त्यांना घरी सोडण्यात आले होते. महिन्याभरात त्यांना दुसऱ्यांदा ‘एम्स’मध्ये पुन्हा दाखल करावे लागले आहे.
शहा यांची पूर्ण वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक असल्याने पावसाळी अधिवेशनापूर्वी त्यांना 1-2 दिवस ‘एम्स’मध्ये दाखल करावे लागणार असल्याचे डिस्चार्जच्यावेळीच स्पष्ट करण्यात आले होते, असे ‘एम्स’च्या माध्यम आणि शिष्टाचार विभागाचे प्रमुख डॉ. आरती विज यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
शहा यांना श्वसनास त्रास जाणवू लागल्याने ते ‘एम्स’मध्ये तपासणीसाठी आले असल्याचे “एम्स’मधील वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले. ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवून आहे.
करोनामुक्त झाल्यानंतर गेल्या महिन्यातही थकवा आणि अंगदुखीमुळे शहा यांना ‘एम्स’मध्ये आणले गेले होते. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण आणखी काही दिवस घरीच विलगीकरणामध्ये राहणार असल्याचे शहा यांनी 14 ऑगस्ट रोजी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले होते.