नवी दिल्ली – मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकार सर्व प्रकारची मदत करेल. मराठवाडा विकासाला प्राधान्य देणार, असल्याचे आश्वासन केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी खासदारअजित गोपछडे यांना मंगळवारी दिले.
खासदार गोपछडे यांनी शाह यांच्या सोबत भेट घेऊन विशेष चर्चा केली. तसेच मराठवाडा विभागातील विविध समस्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान, मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारच्या मदतीची मागणी करण्यात आली.
केंद्र सरकारकडून मराठवाड्यातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य आणि अनुदान उपलब्ध करून देण्याची मागणी देखील करण्यात आली. यासह, सहकारी संस्था व दुग्ध व्यवसायाच्या विस्तारासाठी विशेष योजना राबवण्याची मागणी करण्यात आली.
शेतकऱ्यांसाठी बायोगॅस प्रकल्प सुरू करून त्यांना स्वच्छ ऊर्जा निर्मितीसाठी प्रोत्साहन देणे. केंद्र सरकारच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणावर बायोगॅस व सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात यावे. तर, मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी अतिरिक्त निधी आणि धोरणात्मक पातळीवर निर्णय घेण्याचे देखील, आवाहन करण्यात आले.