बारामतीत जीवनावश्‍यक वस्तूंची “होम डिलिव्हरी’

19 प्रभागांमध्ये सोय उपलब्ध : सोशल मीडियावर फोन नंबर केले व्हायरल

बारामती- “लॉकडाऊन’मुळे बारामती शहरदेखील ठप्प झाले आहे. बाजारपेठेतील गर्दी टाळण्यासाठी नागरिकांना घरबसल्या जीवनावश्‍यक वस्तू मिळाव्यात यासाठी बारामती नगरपरिषदेकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे इथून पुढील काळात जीवनावश्‍यक वस्तूसाठी बारामतीकरांना बाजारपेठेत जावे लागणार नाही. शहरातील काही दुकानदार तसेच व्यापाऱ्यांमार्फत “होम डिलिव्हरी’ मिळणार आहे.

कोणते दुकानदार अथवा व्यापारी होम डिलिव्हरी देणार त्यांची यादी करण्यात आली आहे. त्याच्यामध्ये त्यांचे फोन नंबर नमूद करण्यात आले आहेत. व्यापारी व दुकानदार यांची यादी सोशल मीडियामार्फत बारामतीकरांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. शहरातील 19 प्रभागांमध्ये ही उपाययोजना राबवण्यात येत असून कोणत्या प्रभागासाठी कोणता दुकानदार “होम डिलिव्हरी’ देणार हेदेखील ठरले आहे.

जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, त्यानुसार बारामती शहरात कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करत बारामतीकरांची उत्स्फूर्तपणे बंद पाळला आहे. गर्दी टाळण्यासाठी शासनाने राबवलेल्या उपाययोजनेत बारामतीकरदेखील सहभागी झाले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शहरातील टपरीपासून ते शॉपिंग मॉलपर्यंत सर्व काही बंद ठेवण्यात आले आहे.

  • श्री गणेश मंडळ येथील भाजीविक्रेत्यांना परवानगी
    शहरातील गणेश भाजी मंडई बंद राहणार आहे. शहरातील मुख्य मंडई बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. नागरिकांची गैरसोय व गर्दी टाळण्यासाठी शहरातील काही ठिकाणी छोट्या स्वरूपात मंडईचे दुकान सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी नगरपरिषदेद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. नगरपरिषदेने ठरवून दिलेल्या जागेवर भाजीपाला विक्रेते छोट्या स्वरूपातील दुकान सुरू ठेवणार आहेत. श्री गणेश मंडळ येथील विक्रेत्यांना त्याबाबतची परवानगी देण्यात येणार आहे.
  • शासनाच्या आदेशानुसार सध्या संपूर्ण बारामती शहर लॉकडाऊन आहे. जीवनावश्‍यक वस्तूंसाठी नागरिकांनी रस्त्यावर येऊन गर्दी करू नये यासाठी काही दुकानदार व व्यापाऱ्यांच्या मूर्तीने “होम डिलिव्हरी’ देण्याचा प्रयत्न आहे. त्या व्यापाऱ्यांची तसेच दुकानदारांची फोन नंबर यादी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच शहरातील काही ठिकाणी छोट्या स्वरूपात भाजीपाला विक्री दुकाने सुरू राहतील. त्यासाठी सर्वेक्षणाद्वारे जागा निश्‍चित करण्यात आले आहेत. जीवनावश्‍यक वस्तू नागरिकांना मिळणार आहेत. त्यासाठी नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये.
    – योगेश कडूसकर, मुख्याधिकारी, बारामती नगरपरिषद
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.