सातारा -सातारा शहरातील सदरबझार आणि तालुक्यातील वेळेकामथी, कण्हेर येथे चोरट्यांनी घरफोड्या करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी सातारा शहर व सातारा तालुका पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे.
वेळेकामथी येथील चौकातील वेदांत किराणा स्टोअर्सचे कुलूप तोडून चोरट्यांनी बुधवारी (दि. 22) मध्यरात्री 11 ते गुरुवारी (दि. 23) सकाळी सहा या वेळेत 53 हजार रुपये रोकड चोरून नेली. त्याच गावातील प्रभावती बाळकृष्ण चव्हाण यांच्या घराचे कुलूप तोडून, चोरट्यांनी कपाटातून 60 हजार रुपये किमतीचा दोन तोळ्यांचा राणीहार, 15 हजार रुपयांचा पाच ग्रॅमच्या सोन्याच्या रिंगा, दोन तोळ्यांचे 60 हजार रुपयांचे मंगळसूत्र, असा एकूण
एक लाख 35 हजारांचा ऐवज लंपास केला.
एका रात्री दोन ठिकाणी घरफोड्या झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी लालन संपत चव्हाण (वेळेकामथी) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीस उपनिरीक्षक देव तपास करत आहेत. कण्हेर (ता. सातारा) येथील गणेशनगरात बुधवारी (दि. 22) रात्री 10 ते गुरुवारी (दि. 23) पहाटे साडेपाच या वेळेत चोरट्यांनी चतुरा बाळकृष्ण सकुंडे यांच्या घराचे कुलूप तोडून 32 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व 80 हजार रुपयांची रोकड लंपास केली.
याप्रकरणी सकुंडे यांनी फिर्याद दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत चौधरी तपास करत आहेत. साताऱ्यातील सदरबझारमधील कुपर कॉलनीत चोरट्यांनी विलास जयराम शेंबेकर यांच्या सुरभी’ बंगल्याच्या गेटचे कुलूप तोडून गुरुवारी (दि.23) रात्री दोन लाख रुपये किमतीची ह्युंदाई आय10 ही कार चोरून नेली. याबाबत शेंबेकर यांनी फिर्याद नोंदवली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. के. जगताप तपास करत आहेत.