गुन्हे शाखेची कामगिरी; सव्वा दहा लाखाचा ऐवज हस्तगत
पुणे(प्रतिनिधी) – शहरातील विविध भागात घरफोड्या करणाऱ्या सराईत टोळीला गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने बेड्या ठोकल्या. यावेळी त्यांच्या ताब्यातून एक चारचाकी, एक दुचाकी, सोन्या-चांदीचे दागिणे असा तब्बल सव्वा दहा लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
रविसिंग शामसिंग कल्याणी (रा.रामटेकडी हडपसर), युवराज वसंत मोहिते (रा. कडेगाव, जि. सांगली), तिलकसिंग गब्बरसिंग टाक, आजीनाथ लक्ष्मण गायकवाड अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सर्व आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, यातील रविसिंग कल्याणी याच्यावर वाहनचोरी व घरफोडीचे तब्बल 31 गुन्हे दाखल आहेत. तर तिलकसिंग याच्यावर वाहनचोरी, घरफोडी, दरोडा असे 35 गुन्हे दाखल आहेत. तसेच युवराज मोहिते याच्यावर मित्राचा खून केल्याप्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शहरातील वाढत्या घरफोड्यांना प्रतिबंध करण्यासाठी गस्तीवर असताना पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांना माहिती मिळाली होती की, अट्टल घरफोड्या करणाऱ्या टोळीतील गुन्हेगार फुगे वस्ती भोसरी येथे येणार आहेत. त्यानुसार सापळा लावून रविसिंग कल्याणी व मोहिते या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्यांचे साथीदार तिलकसिंग व गायकवाड या चौघांनी मिळून दत्तवाडी परिसरातील साईबाबा वसाहत येथे घरफोडी करून चोरी केल्याचे सांगितले.
तपासा दरम्यान, आरोपींनी वारजे माळवाडी,दत्तवाडी, अलंकार, स्वारगेट, खडक पोलिस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडी व वाहनचोरीचे गुन्हे केल्याचे समोर आले आहे. ही कामगिरी निरीक्षक राजेंद्र मोहिते, सहाय्यक निरीक्षक भालचंद्र ढवळे, उपनिरीक्षक किरण अडागळे, कर्मचारी किशोर शिंदे,दत्तात्रय गरुड यांच्या पथकाने केली.