107 गावांमधील गरजूंना घरपोच जेवण

बजरंग दल, खेड प्रखंड आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची खेड तालुक्‍यात सेवा

राजगुरुनगर -करोनाच्या आपत्तीकाळात बजरंग दल, खेड प्रखंड व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राजगुरुनगर यांनी विविध माध्यमांतून सेवाकार्य सुरू केले असून, पोलीस आरोग्य कर्मचाऱ्यांना गेल्या दहा दिवसांपासून जेवण, गरजू व्यक्तींना घरपोच सेवा शहरात सुरू करून सामाजिक दायित्व दाखवले आहे. 

करोना लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर राजगुरूनगर व सभोवतालच्या परिसरातील खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 107 गावांपर्यंत हे सेवाकार्य विविध मदतीच्या स्वरूपात पोहोचत आहे. बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांवर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण असल्याने त्यांना जागेवर जेवण पुरवण्याची सेवा, तसेच अपंग, निराधार, व दवाखान्यातील निराधार रुग्णांनाही फूड पॅकेट्‌स गेले 10 दिवस, दिवसातून दोन वेळा पोहोचवले जात आहे.

यासाठी कार्यकर्त्यांच्या दोन दोन जणांच्या दोन टीम केल्या आहेत. त्यातील कार्यकर्ता फूड्‌स पॅकेट स्वच्छतेची, वैयक्तिक आरोग्य सुरक्षिततेची काळजी घेत, सामाजिक अंतर राखत हे दोन वेळेच्या जेवणाचे फूड्‌स पॅकेट पोहोचवतात. हे फूड्‌स पॅकेट्‌स गावातील तब्बल 14 विभागांतून अगदी काही मिनिटांच्या अवधित संकलित केले जातात.

मोती चौक, माणिक चौक, वैशंपायन आळी, साई साम्राज्य सोसायटी, गायत्रीनगर वाडा रोड, वाळुंजस्थळ, शिवसाम्राज्य रेसिडेन्सी, सोसायटी, समतानगर, अयोध्या नगरी, पांडुरंग नगर, ग्रीन पार्क सोसायटी, गढई मैदान, बाजारपेठ अशा विभागांतून नागरिकांनी स्वेच्छेने पॅकेट्‌स तयार करण्याचा निर्धार केला आहे. यासोबतच विस्थापित झालेली कुटुंब महामार्गावरून पायपीट करत असतात तेव्हा त्यांनाही चैतन्य संस्थेच्या किचनमधून बाळासाहेब कहाणे यांच्या माध्यमातून जेवण बनवून फुड पॅकेट्‌स पुरवण्यात आले आहेत.

याच अनुषंगाने दोन्ही संघटनांनी रोजंदारीवर उपजीविका असणाऱ्या श्रमिक वर्गातील, गावोगावी भटकणाऱ्या कुटुंबांनाही जीवनावश्‍यक परिपूर्ण किराणा किट साहित्याचे वाटप करण्यात येत आहेत. आतापर्यंत 1 लाख रुपये किमतीचे किराणा साहित्य वाटप करण्यात आलेले असून हे 100 पेक्षा अधिक कुटुंबांना देण्यात आले आहे.

या सेवाकार्यासाठी जैन युथ ग्रुप, जैन फरसाण, साई मेडिकल आणि अनेक कार्यकर्ते व नागरिकांनी आर्थिक सहाय्य केले, तर काहींनी प्रत्यक्ष वस्तू स्वरूपात धान्य कार्यालयावर आणून दिले. त्या साहित्याचे समप्रमाणात स्वयंसेवकांनी पॅकिंग केले.

200हून अधिक पिशव्या रक्‍त संकलन करणार
आतापर्यंत तालुक्‍यात दोन ठिकाणी कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबीरे घेतली आहेत यात अनुक्रमे 40 व 45 पिशवी रक्‍तदान झालेले आहे. येत्या 11 एप्रिलला राजगुरूनगर गावात संघटनांच्या माध्यमातून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. त्यात 200 पेक्षा अधिक रक्‍त पिशवी संकलित करण्याचा मानस आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.