मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यासंदर्भात दिलेल्या अल्टिमेटमच्या मुद्द्यावरुन राज्यातील चांगलाच गदारोळ माजला आहे. यावरून सर्वपक्षीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिला आहेत. दरम्यान, रविवारी राज ठाकरे यांनी येत्या ५ जून सर्व सहकाऱ्यांसह अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली होती. याच घोषणेवरून आता पुण्यात पोस्टरबाजी करण्यात आली आहे. पुण्यामध्ये राज ठाकरेंनीच काढलेल्या एका व्यंगचित्राच्या माध्यमातून पोस्टरबाजी करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना रेखाटलेल्या व्यंगचित्राची आठवण करुन देणारे होर्डिंग पुण्यातील महत्वाच्या ठिकाणावर लावण्यातआले आहेत. यामध्ये अलका टॅाल्कीज चौक, गुडलक चौक, कोथरुड येथील करिष्मा चौक या महत्वाच्या आणि गर्दीच्या ठिकाणी हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.
मनसे चे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येला जाणार असल्याचे समजते.
सदर व्यंगचित्र काढणारे राज ठाकरे ते हेच का की मग दुसरे कोणी?🤔 pic.twitter.com/lrJFhyle9o— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) April 18, 2022
प्रभू श्रीराम हे चलो अयोध्या असं म्हणणाऱ्या विश्व हिंदू परिषद व भाजपा यांना उद्देशून “अहो देश घातलात खड्ड्यात आणि आता माझ्या नावाने गळा काढत आहात! अरे लोकांनी तुमच्याकडे ‘रामराज्य’ मागितले होते. ‘राममंदिर’ नव्हे…!” असं म्हणत असल्याचं दर्शवण्यात आलं आहे. शिवाय, शेवटी हे राम…! असंही लिहिलेलं दिसत आहे.
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी राज ठाकरे यांनी काढलेले हेच व्यंगचित्र ट्विट करत सोमवारी राज यांच्यावर निशाणा साधला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येला जाणार असल्याचे समजते. सदर व्यंगचित्र काढणारे राज ठाकरे ते हेच का की मग दुसरे कोणी?, असा प्रश्न सावंत यांनी विचारलेला. दरम्यान, पुण्यामधील हे बॅनर्स नेमके कोणी लावले आहेत यासंदर्भातील माहिती अजून तरी समोर आली नाही मात्र यामुळे पुण्यात आणि सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु झाली आहे.