हॉलंडच्या शेवंतीचा सोरतापवाडीत “दरवळ’

शेवंतीने केले शेतकऱ्याला लखपती : 30 गुंठ्यात पाच लाखांचे उत्पन्न

– सचिन सुंबे

सोरतापवाडी – कष्ट, आधुनिक तंत्रज्ञान, भांडवल व बाजारभावाची साथ मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना लखपती होण्यापासून कोणी रोखू शकत नाही, याचे उदाहरण सोरतापवाडी येथे प्रत्यक्षात साकारले आहे. सोरतापवाडीमधील माळवाडी येथील उद्योन्मुख शेतकरी सचिन रामदास चौधरी यांना शेवंती फुलांतून आतापर्यंत 30 गुंठ्यात पाच लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. नवरात्र व दिवाळीत बाजारभाव चांगला मिळाला तर अजून तीन ते चार लाख उत्पन्न अपेक्षित आहे. तीस गुंठ्यात पाच लाखांचे उत्पन्न घेणारे चौधरी यांनी तरूण शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

शेवंती पिकांची पाहणी करण्यासाठी हॉलंड, नेदरलॅन्ड येथील गेराड लेन्थजेस, डेकोनोव्हा यंग प्लॅट बी व्ही हे आले होते. त्यांनी चौधरी यांच्या नावीन्यपूर्ण कृतिशीलतेचे कौतूक केले.

चौधरी म्हणाले, थेऊर येथील प्रिसिजन ऍग्रोटेकमधून दि. 30 मार्च रोजी भाग्यश्री व्हाईट व मानसी ब्रॉंज येलो जातीच्या हॉलंडवरून आणलेल्या शेवंतीची लागवड केली. रासायनिक खताऐवजी जैविक खते वापरली. धायरी येथील शेतकरी योगेश्‍वर चव्हाण यांच्याकडील तीस देशी गाईंचे शेण व मूत्र आणून ते पिकाला सोडले. गांडूळ खतामुळे उन्हाळ्यात फायदा झाला. रंगाने आकर्षक, अधिक पाकळ्या व अधिक टिकाऊपणा असलेल्या हॉलंडच्या शेवंतीला मार्केटमध्ये चांगला बाजारभाव मिळाला. जुलैमध्ये शेवंतीचे उत्पादन सुरू झाले. नोव्हेंबरपर्यंत उत्पादन सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेवंती फुलाने खरेदीदाराचे लक्ष वेधून घेतले आहे. पारंपरिक शेवंतीच्या तुलनेत ही दर्जेदार असल्याने घाऊक फुलबाजारात प्रति किलो 100 ते 150 रुपये व गणेशोत्सवामध्ये 200 ते 250 रुपये भाव मिळाला आहे. यंदा गणेशोत्सवात चौधरी यांच्या शेवंतीची श्रीमंत दगडुशेठ गणपतीच्या सजावटीसाठी निवड केली होती. गोवा व बंगळुरूमध्ये व्यापाऱ्यांनी शेवंती विमानाने नेल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी नवीन प्रयोग व जैविक खते वापरून शेती केली पाहिजे, असे चौधरी यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.