नैसर्गिक रंग आरोग्यदायी होळी

नैसर्गिक रंग निर्मितीचे स्त्रोत
हिरवा -मेंहदीची पाने, गुलमोहराची पाने, पालक, करवंदाची पाने
पिवळा – हळद, बेलाचे फळ, झेंडुची फुले, सूर्यफूल
लाल – रक्तचंदन पावडर, डाळींब, डाळिंबाची साल, जास्वंद
निळा – द्राक्षांच्या काही जाती व निळी जास्वंद
गुलाबी व जांभळा – बीट रुट
तपकीरी – वाळवलेली चहाची पाने
काळा – द्रक्षांच्या व आवळ्याच्या काही जाती

डॉ. प्रियदर्शनी  देशमुख 
गृहविज्ञान  विशेष  तज्ञ
कृषी विज्ञान  केंद्र , कालवडे

होळी म्हणजेच रंगपंचमी. हा रंगाचा उत्सव. भारतामध्ये विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात होळी साजरी करण्यात येते. फाल्गुन महिन्यातील पोर्णिमेला म्हणजेच मार्च महिन्यात दरवर्षी होळीचा सण अगदी उत्साहात साजरा करण्यात येतो. या काळात हिवाळा संपून उन्हाळ्यास प्रारंभ होतो. वातावरणातील जिवाणूंचे प्रमाण वाढलेले असते म्हणून होळी दिवशी घरोघरी होळी पेटवली जाते. त्यामुळे आपल्या अवतीभवतीचे तापमान 50 ते 60 अंश डिग्री सेल्सिअसने वाढते व या जिवाणूंचा विनाश होतो.

धुलिवंदन व रंगपंचमी साजरी करण्यासाठी पूर्वीच्या काळी नैसर्गिक रंगाचा वापर होत असे. हे नैसर्गिक रंग विविध प्रकारच्या फुलांचा, पानांचा, फळांचा, भाज्यांचा, झाडांच्या मुळांचा वापर करुन बनवलेले असतात. परंतु आता धुलिवंदन व रंगपंचमी साजरी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक किंवा कृत्रिम रंगांचा वापर केला जात आहे. रासायनिक रंग स्वस्त दरात व सहज उपलब्ध होत असल्यामूळे याचा वापर जास्त प्रमाणात होतो. कमी प्रतिच्या तेलाचा वापर करुन हे रंग बनवलेले असतात. त्यामध्ये अनेक विषारी घटक असतात. त्याचे आरोग्यावर वाईट परिणाम होतात.
रासायनिक रंगामुळे धोका

रासायनिक रंगामध्ये लेड ऑक्‍साईड, डिझेल, सोडीयम ऑक्‍साईड, कॉपर सल्फेट, मर्क्‍युरी सल्फाईड, ऍल्युमिनियम ब्रोमाईड आदी विषारी घटक वापरले जातात. हे रंग आकर्षक दिसावेत म्हणून त्यात इतरही रासायनिक द्रव्ये वापरली जातात. उदा. ऍस्बेसटॉस पावडर, खडुची भुकटी, सिलिका, ऑरामाईनचा स्टार्च इ. रासायनिक रंगाचे आरोग्यावर हानिकारक परिणाम होतात.

रंग खेळताना घ्यावयाची काळजी
-जास्तीत जास्त शरीर झाकले जाईल असे लांब बाहीचे, कॉलरचे, कॉटनचे जाड कपडे घालावे.
-रंग खेळण्यापूर्वी पूर्ण शरीरावर मॉइश्‍चरायझर किंवा पेट्रोलियम जेली, खोबरेल तेल लावावे, म्हणजे रंगांचा व त्वचेचा थेट संपर्क होणार नाही.
-केसांनाही भरपूर तेल लावावे त्यात थोडा लिंबू मिसळून लावले तर कोंडा होणार नाही व रंगामुळे इन्फेक्‍शन होणार नाही.
-ओठांनाही पेट्रोलियम जेली किंवा लिप बाम लावावा.
-रंग खेळतांना चष्मा, लेन्स काढून ठेवावे.
-रंग खेळण्यापूर्वी व खेळतानाही भरपूर पाणी प्यावे म्हणजे शरीर सजल राहते.
-रंग खेळून झाल्यावर तो साबण लावून घासून न काढता बेसन पीठ व दुधाचा वापर करुन काढावा
-रॉकेल, स्पिरीट आदीचा वापर रंग काढण्यासाठी करु नये
-गरम पाण्यामुळे रंग त्वचेवर जास्त पक्का बसतो. त्यामुळे थंड पाणी वापरुन रंग काढावा
-रंग खेळल्यावर व नंतर तो पूर्णपणे निघून जाईपर्यंत उन्हात जाऊ नये
-डोळ्यांचा काही त्रास होत असेल तर त्वरीत डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा

रासायनिक रंगांचे परिणाम खूप भयावह असल्यामुळे नैसर्गिक रंगांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यासाठी जनजागृती केली जात आहे. परंतु तुलनेत नैसर्गिक रंग निर्मिती खूप कमी होते. ग्रामीण व शहरी भागातील बेरोजगार महिला या संधीचा फायदा घेऊन नैसर्गिक रंगनिर्मितीचे काम करू शकतात. त्यातून त्यांना रोजगार निर्माण होऊ शकतो. नैसर्गिक रंगनिर्मितीचे प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्रामार्फत दिले जाते. या व अशा शेतीविषयक प्रशिक्षणाबाबत कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. निलेश मालेकर व तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते.

रासायनिक रंग आरोग्यास हानिकारक असल्यामुळे सर्वांनी याचा वापर कटाक्षाने टाळावा व नैसर्गिक रंगांचा वापर करावा. नैसर्गिक रंगांची मागणी वाढली तर त्याचा दरही कमी होऊ शकतो व सर्वांना आरोग्यदायी रंगपंचमी साजरी करता येईल, शिवाय पर्यावरणास कुठलीही हानी पोहचणार नाही कारण नैसर्गिक रंगाच्या वापरामुळे पाणी व माती दूषित होत नाही.

रासायनिक रंग आरोग्यास हानिकारक असल्यामुळे सर्वांनी याचा वापर कटाक्षाने टाळावा व नैसर्गिक रंगांचा वापर करावा. नैसर्गिक रंगांची मागणी वाढली तर त्याचा दरही कमी होऊ शकतो व सर्वांना आरोग्यदायी रंगपंचमी साजरी करता येईल, शिवाय पर्यावरणास कुठलीही हानी पोहचणार नाही कारण नैसर्गिक रंगाच्या वापरामुळे पाणी व माती दूषित होत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.