होळी हा सण आहे मौजमजेचा आणि बागडण्याचा. वसंत ऋतूच्या सौंदर्याची नांदी होळीच्या सणातून वाजू लागते. भारतात होळी साजरी केली जाते रंगांच्या माध्यमातून. एकमेकांच्या चेह-यावर रंग लावून होळीच्या शुभेच्छा देण्याची पद्धत भारताच्या अनेक भागांत आहे. जुन्या काळात हे होळीचे रंग झाडाची नैसर्गिक पाने-फुले वाटून तयार केले जायचे. त्यात चंदनाची भुकटी, केशर वगैरे वापरले जायचे. हे सर्व पदार्थ त्वचेसाठी चांगले होते. उत्तम आरोग्यासाठी ते उपकारक होते.
मात्र, अलीकडील काळात या रंगांचे घटकपदार्थ बदलले आहेत. औद्योगिकीकरणानंतर नैसर्गिक रंगांची जागा स्वस्तातील रंगांनी घेतली आहे. अनेक रासायनिक प्रक्रियांद्वारे हे रंग तयार केले जातात. या कृत्रिम रंगांमध्ये मॅलाशाइट ग्रीन, ऑरामाइन, मिथाइल व्हॉयलेट आदींचा अंतर्भाव असतो. हे रंग नंतर स्टार्च किंवा कणीक व मिका डस्टसोबत मिसळले जातात. त्यामुळे अॅलर्जी तसेच प्रादुर्भावाची शक्यता आणखी वाढते.
परिणामी, होळीचा सण झाल्यानंतर लगेचच विविध अॅलर्जी तसेच जळजळ होत असल्याची तक्रार घेऊन क्लिनिक्समध्ये येणा-या रुग्णांची संख्या प्रचंड वाढते. होळी किंवा त्यानंतरच्या काही दिवसांतील या समस्यांना म्हणूनच होळी डर्माटोसेस असे म्हटले जाते. याचा परिणाम शरीराच्या कोणत्याही भागावर होऊ शकतो.
रंगछटा आणि त्वचेच्या अवस्थेवरून केल्या जाणा-या प्रकारांमध्ये विशिष्ट असा संबंध नसला, तरी रंगांचा सर्वाधिक परिणाम चेह-यावर होतो. कारण, रंग बहुतेकदा चेह-यावरच फासला जातो. हाताच्या त्वचेवर त्या खालोखाल परिणाम होतात. कारण, रंग तयार करण्यासाठी हातांचा वापर होतो. याशिवाय डोक्याची त्वचा, हाताचा पुढील भाग, हात आणि खांद्यांखालील भागावर (धड) परिणाम होतो. चेह-यावर किंवा डोक्यावर रंग फासण्यासाठी हाताने चोळण्यासारख्या अनेक पद्धतींमुळे त्वचेवर ओरखडे उमटतात आणि परिणामी अनेक प्रकारचे प्रादुर्भाव व दाह निर्माण होतात. डर्माटोसेसचा सबंध सहसा त्रासदायक, अॅलर्जिक संपर्काशी आणि यांत्रिक घटकांशी आहे.
होळी डर्माटोसेस बरे होण्यासाठी…
1. खाज सुटणे, जळजळ यांसारख्या त्वचेला त्रास देणा-या समस्यांवर तत्काळ उपचार झाले पाहिजेत. त्वचेवरील कोणताही रंग किंवा पेंट तत्काळ थंड पाण्याने धुऊन टाकावा. योग्य उपचार मिळावेत यासाठी तुम्ही त्वचारोगतज्ज्ञांना किंवा डर्माटोलॉजिस्टना दाखवले पाहिजे
2. लक्षणे कमी करण्यासाठी प्रभावित जागी कोर्टिकोस्टेरॉइड ऑइंटमेंट लावणे
3. त्वचा बरी करण्यासाठी प्रतिजैवके (अॅण्टिबायोटिक्स) किंवा अँटीफंगल औषधे घेणे
4. त्वचेचा शुष्कपणा कमी व्हावा म्हणून काही आरामदायी ऑइंटमेंट्स त्वचेला लावणे
5. कोणतेही तीव्र रंग नसलेल्या सौम्य पीएच फ्रेण्डली साबणाने त्वचा धुणे
6. प्रादुर्भाव तीव्र असेल, तर तोंडावाटे घेण्याची औषधेही दिली जाऊ शकतात.
लक्षणे..
1. डोळे किंवा अन्य अवयवांना खाज सुटणे
2. जळजळ होणे
3. वेदना
4. स्त्राव किंवा पाणी येणे
5. त्वचेच्या ढलप्या निघणे
6. गजकर्णासारखी जखम
- त्वचा झिजल्यासारखी होणे/ब्लिस्टर्स
- झेरोसिस
- एरिथिमा
- युटीकॅरिअल
- अॅक्युट नेल-फोल्ड इन्फ्लमेशन
- पूर्वीपासून असलेल्या त्वचारोगांमध्ये वाढ होणे (उदाहरणार्थ – मुरूम, इग्झिणा आणि पॅरोनिशिया)
प्रतिबंध
1. सेंद्रिय व नैसर्गिक रंगांचा वापर करा. तुम्ही काही रंग घरीही करू शकता. हळद आणि भाजलेले बेसन मिसळून तुम्ही गुलाल तयार करू शकता, यात जास्वंदीचे फूल वाटून घातले तर सुंदर रंग तयार होतो.
2. अतिसंवेदनशील त्वचा, एग्झिमा, सोरायसीस आणि गजकर्णासारखे त्वचाविकार असलेल्यांनी रंगांशी संपर्क टाळणेच उत्तम.
3. रंग खेळण्यापूर्वी केस व डोक्याच्या त्वचेवर खोबरेल तेल लावा, म्हणजे त्वचेची रंध्रे रंगामुळे बंद होणार नाहीत.
4. त्वचेवर सुरक्षेचे एक आच्छादन तयार करण्यासाठी कोरफडीचा गर व तेल लावा. कानाच्या भागावर कोरफड व तेल लावण्यास विसरू नका.
5. डोळ्यांत रंग गेल्यास लगेच डोळे धुऊन टाका. डोळ्यांतून रंग बाहेर यावा म्हणून पापण्यांची उघडझाक करू नका, त्यामुळे केवळ हानी होईल.
- त्वचेचे नुकसान टाळण्यासाठी त्वचेवर सन स्क्रीन लोशन लावा.
- ओठांची आद्र्रता कायम राखण्यासाठी त्यांवर व्हॅसलिन लावा. तुम्ही कानांवरही व्हॅसलिन लावू शकता.
- नखांवर पारदर्शक नेलपेंट लावा. नखांच्या आतल्या बाजूनेही हे नेलपेंट लावा, जेणेकरून नखांद्वारे रंग त्वचेमध्ये प्रवेश करू शकणार नाहीत.
- नियमित पाणी व फळांचे रस पित राहून शरीरातील आद्र्रता कायम राखा.
- किमान रासायनिक रंग तर टाळलेच पाहिजेत.
एकदा का मनसोक्त रंग खेळून झाले की, मग त्यानंतर त्वचेची काळजी कशी घ्यायची यावर लक्ष केंद्रित करा. काही वेगळे आढळल्यास त्वचेसाठी तत्काळ उपचार घ्या. हे सोपे उपाय केलेत, तर तुम्हाला होळीचा आनंदही लुटता येईल आणि तुमची त्वचा निरोगी व मुलायम राखता येईल.
1. भरपूर पाणी वापरून चेहरा आणि अंग धुऊन काढा.
2. बेबी ऑईलचा वापर करून त्वचा स्वच्छ करा.
3. रंग खेळल्यानंतर किमान ४८ तास त्वचा घासू (स्क्रबिंग) नका.
4. त्वचेचे एक्सफॉलिएशन आणि क्लिंजिंग करण्यासाठी दही किंवा बेसनासारखे नैसर्गिक घटक वापरा.
5. स्नान झाल्यानंतर संपूर्ण अंगाला मॉइश्चुरायझर लावून त्यातील आद्र्रता कायम राहील याची खात्री करा.