भारताचा पोलंडवर 10-0 असा विजय

इपोह -सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेच्या अखेरच्या साखळी सामन्यात भारतीय संघाने कमकुवत पोलंड संघाचा 10-0 असा धुव्वा उडवला आहे. या सामन्यात कर्णधार मनदीप सह भारतीय खेळाडूंनी सहा मैदानी गोल केले तर चार गोल पेनल्टी कॉर्नरने केले. भारतीय संघ यासामन्याअगोदरच गुणतक्त्‌यात पहिल्या स्थानी असल्याने अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला होता. विजेतेपदासाठी भारत आणि दक्षिण कोरिया 30 मार्च रोजी एकमेकांसमोर येतील.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय आक्रमकपटूंनी आक्रमणे करण्यास सुरुवात केली आणि पहिल्याच मिनिटाला विवेक प्रसादने गोल करत आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सातव्या मिनिटाला कर्णधार मनदीपच्या पासवर सुमीत कुमारने गोल करत आघाडी 2-0 केली. त्यानंतर भारताने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत आघाडी वाढवली. मध्यंतर झाले तेव्हा भारताने 6-0 अशी आघाडी घेतली होती.

मध्यंतरानंतरही सामन्यावर भारताचे वर्चस्व राहिले. कर्णधार मनदीपने 50 आणि 51 व्या मिनिटाला मैदानी गोल करत भारताची आघाडी मजबूत केली. तर 55 व्या मिनिटाला अमित रोहिदासने पेनल्टी कॉर्नरने गोल करत भारताची आघाडी 10-0 केली.

या विजयामुळे भारताने सहा संघ सामील असलेल्या या स्पर्धेत पाच सामन्यात चार विजय आणि एक बरोबरी साधत स्पर्धेत अपराजित राहण्याची कामगिरी केली आहे. पहिल्या सामन्यात आशियाई सुवर्ण विजेत्या जपानचा 2-0, मलेशियाचा 4-2, कॅनडाचा 7-3 आणि पोलंडचा 10-0 असा पराभव केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.