नवी दिल्ली – देशपातळीवर अनेक लोक मदतीसाठी पुढे येत असताना क्रीडा संघटनाही आपली जबाबदारी ओळखून पंतप्रधान सहाय्यता निधीला मदतीचा हात देत आहेत. राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीच्या सर्वोच्च संघटनेने म्हणजेच हॉकी इंडियाने 25 लाख रुपयांची मदत केली आहे.
करोनामुळे ज्यांना उपचार घ्यायचे आहेत तसेच त्यांच्या जेवणाचा आणि औषधांचा तुटवडा भासू नये यासाठी ही मदत दिली असल्याचे संघटनेने सांगितले आहे. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना म्हणुन नावाजली जात असलेल्या बीसीसीआयने केलेल्या मदतीनंतर अनेक क्रीडा संघटना या कामी पुढे आल्या आहेत. त्यात हॉकी इंडियासह मुंबई, तमिळनाडू, कर्नाटक, गुजराथ, मध्य प्रदेश यांच्यासह देशातील क्रिकेटच्याच नव्हे तर अन्य खेळांच्या संघटनांनीही पंतप्रधान निधीला मदत केली आहे.
करोनामुळे देशात विलगीकरण कक्ष तसेच साधन सामग्री तसेच रुग्णालयातील जागा कमी पडत आहेत. या कामी देशातील अनेक क्रीडा संघटनांनी आपल्या ताब्यातील किंवा मालकीची मैदाने या कामी देण्याची तयारी केली आहे. देशातील प्रत्येक नागरिकाने पुढे येऊन आपल्याला जमेल ती मदत करणे आवश्यक बनले आहे. हॉकीला आणि हॉकीपटूंना देशवासियांनी दिलेल्या प्रेमाची परतफेड करणे शक्य नाही मात्र, आता त्यांची मदत करण्याची संधी आम्हाला मिळाली आहे, असे हॉकी इंडियाने स्पष्ट केले आहे.