बिगरकाश्‍मिरी नागरिकांच्या हत्येमागे हिज्बुलचे दहशतवादी

श्रीनगर  -दक्षिण काश्‍मीरच्या शोपियॉं जिल्ह्यात अलिकडेच दोन बिगरकाश्‍मिरी नागरिकांची हत्या करण्यात आली. तसेच, सफरचंद वाहून नेणारा एक ट्रक पेटवून देण्यात आला. त्या कृत्यांमागे हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचे दोन सदस्य असल्याचे उघड झाले आहे.

जम्मू-काश्‍मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द करण्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने ऑगस्टच्या प्रारंभी घेतला. त्या धडक पाऊलामुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. त्याशिवाय, दहशतवादी संघटना बिथरल्या आहेत. त्यातून पाकिस्तानच्या पाठिंब्याने काश्‍मीरमध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी दहशतवादी संघटना प्रयत्नशील आहेत.

त्याचाच भाग म्हणूून अलिकडेच शोपियॉंत राजस्थानमधील एका ट्रकचालकाची आणि पंजाबमधील एका सफरंचद व्यापाऱ्याची हत्या करण्यात आली. त्या हत्येमागे असणाऱ्या हिज्बुलच्या दोन दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. त्यांची छायाचित्रे शोपियॉंच्या विविध भागांत लावण्यात आली आहेत.

त्यांच्या अटकेसाठी उपयुक्त ठरणारी माहिती देण्याचे आवाहन स्थानिकांना पोलिसांकडून करण्यात आले आहे. भारतीय बाजारपेठेत काश्‍मीरमधील सफरचंदे पाठवू नयेत, अशा धमक्‍या स्थानिकांना दिल्या जात आहेत. त्यातून सफरचंदांचा व्यापार रोखण्यासाठी हिज्बुलचे दहशतवादी नापाक कृत्य करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.