श्रीनगर – जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगरच्या जवळ सुरक्षा रक्षकांबरोबर झालेल्या चकमकीमध्ये हिज्बुल मुजाहिदीन संघटनेचा कमांडर ठार झाला. तर आणखी एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.
रंगरेत भागात विमानाच्या उड्डाणासाथी असलेल्या मोकळ्या जागेमध्ये दहशतवादी लपून बसले असल्याच्या गोपनीय माहिती मिळाल्यावर सुरक्षा रक्षकांनी या भागाची नकाबंदी केली अणि शोधमोहिमेला सुरुवात केली होती. या शोधमोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार करायला सुरुवात केली.
याला सुरक्षा दलांकडून प्रत्युत्तर दिले गेले आणि चकमकीला सुरुवात झाली. या चकमकीदरम्यान एक दहशतवादी मारला गेला. तर आणखी एका दहशतवाद्याला अटक करण्यात सुरक्षा दलांना यश आले.
चकमकीमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव डॉ. सैफुल्ला असे होते आणि तो हिज्बुल मुजाहिदीन संघटनेच कमांडर होआ. तो वेगवेगळ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये वॉन्टेड होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनास्थळावरून शस्त्रे आणि दारुगोळ्यासह गुन्हेगारीशी संबंधित काही साहित्यही जप्त करण्यात आले आहे.
सुरक्षा दलांचे मोठे यश
सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीमध्ये हिज्बुल मुजाहिदीनचा मुख्य कमांडर डॉ. सैफुल्ला ठार झाला. हे सुरक्षा रक्षकांना मिळालेले मोठे यश असल्याची प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे. काश्मीर खोऱ्यातील एक ‘मोस्ट वॉन्टेड’ आणि सुरक्षा दलांवर अनेक हल्ल्यांमध्ये सामील असलेला अतिरेकी रियाझ नाईकू यांची या वर्षाच्या मे महिन्यात हत्या झाल्यानंतर सैफुल्लाने हिज्बुल मुजाहिदीनचे नेतृत्व स्वीकारले होते.
ही छोटी कामगिरी नाही, असे काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी पत्रकारांना सांगितले. सैफुल्ला दक्षिण काश्मीरमधून येऊन एका घरात लपला आहे, अशी माहिती मिळाली होती.
सुरक्षा रक्षकांनी केलेल्या कारवाईत जो दहशतवादी ठार झाला तो सैफुल्ला आहे, अशी 95 टक्के खात्री पटली आहे. त्याच्या मृतदेहाची तपासणी करून याबाबत खात्री केली जात असल्याचे कुमार म्हणाले. जम्मू काश्मीरमध्ये पोलिसांचे नेटवर्क खूपच सक्षम झाले आहे आणि लपून बसलेल्या दहशतवाद्यांबाबत सुरक्षा दलांना लगेच माहिती मिळते आहे, असेही त्यांनी सांगितले.