ओझर : जुन्नर तालुक्यात गाजलेल्या “लग्नाची एक गोष्ट’ चा थेट संबंध हिवरे बुद्रुक गावाशी आहे. याच गावातील वऱ्हाडी मंडळीतील चौघांना करोनाची लागण झाल्याने संपूर्ण गाव प्रतिबंधित क्षेत्र व या गावाचा बाजूचा 5 किमी परिसर हा बफर झोन घोषित करण्यात आला आहे. दरम्यान, या चौघांच्या संपर्कात आलेल्या 21 जणांचे अहवाल प्रतीक्षेत असल्याने संपूर्ण गाव गॅसवर आहे.
संबंधित बाधितांच्या संपर्कात लग्नामुळे गावातील अनेक लोकांचा संपर्क आला होता. हे सर्वेक्षणात आढळून आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून वारुळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी रविवारी (दि. 12) गावातील 21 लोकांना तपासणीसाठी लेण्याद्री येथील कोविड सेंटर येथे पाठवले होते. या सर्वांचे नमुने पुणे येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठवले असून त्याचा अहवाल काय येतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
या कुटुंबीयांच्या संपर्कात असलेल्या आणखी 3 जणांना गेली 3 दिवस ताप, सर्दी व कफ याचा त्रास जाणवत असल्याने त्यांना सोमवारी (दि. 13) तपासणीसाठी लेण्याद्री येथे पाठवण्यात आले असल्याची माहिती डॉ. वर्षा गुंजाळ यांनी दिली. संबंधित ग्रामस्थांना त्रास होत असल्याने गावातील अनेक जणांचे धाबे दणाणले असून संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, रुग्ण आढळत असल्याने ग्रामपंचायत मार्फत संपूर्ण गावात फवारणी करण्यात आली असून, लोकांमध्ये जनजागृती करण्यास सुरुवात झाली आहे. गावात येणार मुख्य रस्ता बंद करण्यात आला आहे. तर विविध ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून फलक लावण्यात आले आहेत. फक्त शेतीच्या कामांसाठी लोक घरातून बाहेर पडत आहेत.