देशाला दिशा देणारे हिवरे बाजार

जगामध्ये तिसरे महायुद्ध झाले तर ते पाण्यामुळे होईल असे म्हटले जाते. या पाण्याचे योग्य नियोजन केले तर पृथ्वीवर स्वर्गाची निर्मिती होऊ शकते. मात्र, आपल्याकडे जाणीवपूर्वक काही गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते. यातील एक विषय म्हणजे पर्यावरणाचे संरक्षण. वनक्षेत्र तेहतीस टक्के असायला हवीत. मात्र, ती आपल्या देशात एकवीस टक्के आहेत. यामध्ये महराष्ट्रातील काही भागांची परिस्थिती तर अत्यंत गंभीर आणि विचार करण्याजोगी आहे. या स्थितीमध्ये संपूर्ण देशासमोर आदर्श असणारे गाव म्हणजे हिवरे बाजार.

आपल्या भरीव कामगिरीने हिवरे बाजार आज जगाच्या नकाशावर आले आहे. आयुष्याची वेगवेगळी स्वप्ने रंगवत तारुण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या एका तरुणाला आपले गाव खुणावत होते. या तरूणाचे नाव म्हणजे पोपटराव पवार. त्यांच्यासमोर खूप चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध असूनही त्यांनी गावाकडे चला या गांधीजींच्या संदेशाचे पालन करीत गावाकडे जाण्याचे ठरविले. 1989 ला पवार हे गावामध्ये दाखल झाले. 26 जानेवारी 1990 ला गावामध्ये त्यांनी पहिली ग्रामसभा घेऊन गावकऱ्यांसमोर आपले विचार ठेवले. येथून हिवरे बाजार या गावाचा दुष्काळग्रस्त ते आदर्श गाव हा प्रवास सुरू झाला. पर्यावरण पूरक अभ्यास आणि त्याला कष्टाची जोड देत त्यांनी सामुहिक कामावर भर दिला. लोकांना एकत्र करून सार्वजनिक काम निर्माण करणे हे महाकठीण आव्हान त्यांनी लिलया पेलले. स्वत: निर्व्यसनी राहत संपूर्ण गावाला त्यांनी व्यसनापासून अलिप्त ठेवले. गावात असणारे दारूचे दुकाने बंद करण्यात त्यांना यश आले.

तरूणांचे संघटन करीत त्यांच्या हाताला काम देत, त्यांना गावपातळीवर आर्थिक सक्षम बनविले. गेली तीन दशक सातत्यपूर्ण काम करणारे हिवरे बाजार आज संसद आदर्श ग्राम योजनेसाठी मॉडेल म्हणून निवडण्यात आलेले आहे. ऊस, केळी अशी जास्त पाणी लागणारी पिके घेण्यावर हिवरे बाजार येथे पूर्णतः बंदी आहे. गावातील सर्व निर्णय सर्वानुमते होतात. ग्रामसभा या वेळेप्रमाणे होतात विशेषतः त्यामध्ये समस्त गावकरी मंडळी उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. प्रत्येक महिन्याला न चुकता ग्रामसभा होते.

1995 पासुन पवार हे मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये प्रमुख व्याख्याता म्हणून ते भावी आयएएस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी जातात. गावातील सर्व घरांना एकसारखा पांढरा रंग आणि घरांवर महिलांचे नाव ही हिवरे बाजारची आणखी एक ओळख. गावामध्ये पुरूषांपेक्षा स्त्रियांची संख्या अधिक आहे. पाण्याचे अंदाजपत्रक गावकरी बनवितात आणि त्यानुसारच उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर करतात. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी स्वत: बॅंकेतील व्यवहार करतात. दरडोई उत्पन्न काहीशे वरून आज हजारोंच्या घरात गेले आहे. शहराकडे स्थलांतरित होणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाही आज हिवरे बाजार येथून शहरात गेलेली माणसे गावाकडे पुनः राहण्यासाठी येत आहेत. गावामध्ये सलोख्याचे वातावरण आहे. येथील जमीन बाहेरील कोणीही व्यक्ती विकत घेऊ शकत नाही.

सामुहिक श्रमदानातून त्यांना पर्यावरण पूरक काम करण्यात यश मिळाले आहे. श्रमदान, चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, नशाबंदी, कुटुंब नियोजन ही पंचसूत्री राबवीत त्यांनी गावाला आदर्श बनविले आहे. गावामध्ये कुपनलिका पाडण्यासाठी बंदी आहे.

अशाप्रकारे पोपटराव पवार यांनी हिवरे बाजारच्या रूपाने देशाला एक आदर्श दिला आहे. यातून प्रेरणा घेऊन सर्वांनी आपापल्या पातळीला काय करू शकतो, याचा विचार करावा. शेवटी, या तीन दशकांच्या प्रवासामध्ये त्यांना असंख्य अडचणी आल्या मात्र, त्यांनी आपला संघर्ष कायम चालू ठेवला. महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा.

– श्रीकांत येरूळे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.