कबीर बोबडे
नगर – जिल्ह्यात सहा ते सात वर्षापूर्वी एचआयव्ही रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली होती. हे वाढते प्रमाण लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने गेल्या चार ते पाच वर्षांपासून एड्स निर्मूलनावर प्रभावीपणे काम करण्यास सुरूवात केली. जनजागृतीसह प्रबोधनावर भर दिला. काही सेवाभावी संस्थांनी देखील याबाबत जनजागृती केली. विविध उपयायोजना राबविली. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून एचआयव्हीचे प्रमाणात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. सध्या जिल्ह्यात 638 एचआयव्हीचे रुग्ण असल्याचे सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यात 2002 मध्ये एचआयव्हीचे प्रमाण 31.2 टक्के होते. त्यानंतर तब्बल 17 वर्षांनी हे प्रमाण आता 2019 मध्ये 0.5 टक्के म्हणजे एक टक्क्यापेक्षाही कमी झाल्याचे आकडेवारीतून समोर आले. जिल्ह्यात नोव्हेंबर 2019 अखेर 1 लाख 20 हजार 546 रुग्णांचे समुपदेशन करण्यात आले. त्यापैकी 1 लाख 19 हजार 447 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून जिल्ह्यात 938 जण एचआयव्हीग्रस्त आहेत. या एचआयव्हीग्रस्तांमध्ये पुरूषांची संख्या 334, तर महिलांची संख्या 304 इतकी आहे. सन 2016 मध्ये गर्भवती मातांची संख्या 34 होती, सन 2017 मध्ये 52, सन 2018 मध्ये 34, तर यंदा गर्भवती मातांच्या संख्येत घट होवून ती संख्या 26 वर आली. एचआयव्ही आढळून असलेल्या बालकांची संख्या 3 आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय एड्स कार्यक्रमांतर्गत येणाऱ्या नवीन पिढीमध्ये एचआयव्ही संसर्ग होऊ नये, यासाठी पीपीटीसीटी प्रकल्प राबवण्यात येत आहे.
त्यामध्ये गरोदर मातांची तपासणी करून संसर्गित माता व बालकास उपचार दिले जातात. सध्या गर्भवती मातांमध्ये एचआयव्ही बाधितांचे प्रमाण 5.24 टक्क्यांवरून 0.02 टक्के झाले आहे. एचआयव्ही प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. एचआयव्ही तपासणी व उपचारही मोफत केले जात आहेत.त्याअंतर्गत जिल्ह्यात एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय स्तरावर तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात एचआयव्ही समुपदेशन व चाचणी करण्यासाठी 28 आयटीसी केंद्र कार्यरत आहेत. तसेच नगर शहरातील जिल्हा रुग्णालय व लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्ट येथे मोफत उपचार केले जातात.
एड्स दिनानिमित्त उपक्रम
जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालयाच्या वतीने जनजागृतीपर उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यामध्ये रविवारी (दि.1 डिसेंबर) जनजागृती प्रभात रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर एचआयव्ही चित्रफीत दाखवली जाणार आहे. पथनाट्यामार्फत जनजागृती केली जाणार आहे. एचआयव्ही तपासणीचे महत्त्व या विषयावर पोस्टर स्पर्धा घेण्यात येणार आहे. महाविद्यालयातील युवकांसाठी युवसंवाद, व्याख्यान यासोबतच होर्डींगस, पोस्टर्स प्रदर्शित करून जनजागृती केली जाणार आहे. त्यानंतर निबंध स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा असे उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.