करोनाग्रस्त मुंबईतील क्रिकेटविरांची पंचाईत

वैयक्‍तिक सरावालाच मंडळाची परवानगी

मुंबई – भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) येत्या काळात सराव सत्र सुरू करण्याच्या विचारात आहे. भारतीय संघातील सर्व खेळाडू तसेच सेकंड बेंचमधील नवोदित खेळाडूंना या सराव सत्रात सहभाग घेता येणार असला तरी हिटमॅन रोहित शर्मा व अजिंक्‍य रहाणे यांना मात्र या सत्राला मुकावे लागणार आहे.

करोनाचा धोका खासकरून मुंबईत वाढत आहे. तसेच हे दोघे ज्या भागात राहतात तो भाग रेड झोन जाहीर झाल्याने त्यांना सराव सत्रात सहभाग घेणे शक्‍य होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. देशात चौथे लॉकडाऊन असले तरी सरकारने मैदाने व क्रीडा संकुले खुली करण्यास परवानगी दिलेली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना प्रवेश न देता खेळाडूंसाठी तसेच सपोर्ट स्टाफसाठी या सर्व सुविधा सज्ज करण्यात आल्या आहेत. खेळाडूंना जरी या सत्रात भाग घेण्याची परवानगी असली तरीही हा सराव एकत्र करता येणार नसून वैयक्‍तिक पातळीवरच याचा वापर करता येणार आहे. तसेच गोलंदाजांना चेंडूदेखील वेगवेगळेच वापरावे लागणार आहेत. ग्रीन झोनमधील खेळाडूंना सराव करता येणार असून रेड झोनमधील रोहित व अजिंक्‍य यांना मात्र त्यात सहभागी होता येणार नसल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.

औषध सापडले तरच स्पर्धा….

मुंबई क्रिकेट संघटनेच्या तसेच मंडळाच्या अखत्यारीतील मैदानावर हा सराव आयोजित केला जाणार आहे. मात्र, जोपर्यंत करोनाचा धोका संपुष्टात येण्यासाठी लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत प्रत्यक्ष स्पर्धा मात्र आयोजित करता येणार नाही, असेही संघटनेने स्पष्ट केले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×