हितेश मुलचंदानी खून प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक

पिंपरी  – पिंपरी येथे हॉटेलसमोर झालेल्या किरकोळ वादातून हितेश मुलचंदानी या तरुणाचा खून झाला होता. या खून प्रकरणातील चार आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती, परंतु पाचवा आणि मुख्य आरोपी अद्याप फरार होता. फरार मुख्य आरोपीला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी सोमवारी (दि. 12) अटक केली. शहाबाज शिराज कुरेशी (वय 22, रा. सुरती मौहल्ला, खडकी बाजार, पुणे) असे अटक केलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे.

काय आहे खून प्रकरण

पाचही आरोपी दारू घेण्यासाठी पिंपरीतील कुणाल हॉटेलमध्ये आले होते. आरोपी अमीन खान हॉटेलच्या गेटवर लघुशंका करू लागल्याने हॉटेलमधील कर्मचारी व आरोपींमध्ये भांडण झाले. त्यावेळी आरोपीला पकडून ठेवणाऱ्या हितेश मुलचंदानी याचे मोटारीतून अपहरण केले. त्यानंतर शहाबाज याने बकऱ्याची कातडी सोलण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या छोट्या चाकूने हितेशच्या गळ्यावर वार केले. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मागील रस्त्यावर हितेशचा मृतदेह टाकून दिला.

आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली मोटार देखील चोरीची होती. मोटार पिंपळे-निलख येथून चोरल्याची कबुली दिली आहे. कुरेशी हा ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील डोंगर पायथ्याजवळ असलेल्या सुचकानाना येथील झोपडपट्टीत भाड्याने खोली घेऊन राहत होता. गुन्हे शाखा युनिट दोनचे निरीक्षक बालाजी सोनटक्‍के, कर्मचारी दिलीप चौधरी, शिवानंद स्वामी, संजय पंधरे, शिवाजी मुंडे, अतिश कुडके, नामदेव कापसे, अजित सानप यांनी ही कामगिरी केली.

कुरेशी टोळीला लावला जाणार मोक्‍का

शहाबाज कुरेशी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील विविध पोलीस ठाण्यात तब्बल 22 गुन्ह्यांची नोंद आहे. कुरेशी टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्‍का) कारवाई केली जाणार आहे. शहाबाज याच्या वडिलांवरही पोलिसांनी मोक्‍का अंतर्गत कारवाई केली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×