संगणक शिक्षण देणारी जिल्ह्यातील पहिली वाठारची हायटेक शाळा

जिल्ह्यात आयएसओ शाळेचा पहिला मान ; गुणवत्तेत गरुडभरारी

वाठार – गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच संगणक शिक्षण देणारी जिल्हा परिषदेची वाठार हाय टेक शाळा म्हणून ओळखली जात आहे. गत काही वर्षांपासून या शाळेने शिक्षण क्षेत्रात यशाची गरुड भरारी मारून चांगलाच नावलौकिक मिळविला आहे. वाठार, ता. कराड हे पुणे-बेंगलोर महामार्गालगत कराड पासून कोल्हापूरच्या दिशेने अवघ्या 11 किलोमीटर अंतरावर सेवा रस्त्यालगत वसलेले गाव आहे. गत काही वर्षांपासून वाठार येथे विविध प्रकारच्या खाजगी शिक्षण संस्थांमार्फत विविध प्रकारच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे वाठार हे गाव शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.

कृष्णाकाठ तसेच विविध भागातून भरमसाठ देणग्या देऊन पैसेवाल्यांची मुले शिक्षण घेतात. याउलट सर्वसामान्यांची मुलं प्राथमिक शाळेत शिक्षण घेतात. त्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने या शाळेतील हुशार, अभ्यासू शिक्षकांनी स्वतःला झोकून देऊन शालेय काम सुरु ठेवले आहे. प्रयत्नांती परमेश्‍वर, या उक्तीप्रमाणे सातत्याने शाळेचा कायापालट करण्याच्या ध्यासाने येथील सर्वच शिक्षकांनी कंबर कसून चिकाटीने प्रयत्न केल्यामुळेच आज या शाळेमध्ये आकर्षक इमारतीच्या रुपाने नंदनवन फुलले आहे. असेच म्हणावे लागेल. शाळेतील गुणवंत अभ्यासू शिक्षक वर्ग, सुजाण पालक, व शिक्षणाची जाण असणारे मेहनती दाते, लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्यातून वाठारच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा कायापालट झाला आहे.

कार्यतत्पर लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नातून शाळेची जुनी इमारत पाडून त्याठिकाणी खासदार व आमदार फंडातून 50 लाख रुपये खर्चातून भव्य व देखणी अशी अत्याधुनिक सेवा असणारी प्रशस्त शाळा इमारत उभी राहिलेली आहे. या शाळेत सर्वच वर्गात संगणक व प्रोजेक्‍टरची सोय आहे. तसेच स्वतंत्र संगणक लॅब, ज्ञानरचनावादी अध्ययन अध्यापन पद्धती, शैक्षणिक साहित्य निर्मिती, नाविन्यपूर्ण गणवेश, गणित व इंग्रजी विषयासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती झाली आहे. या शाळेत पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग असून एकूण 156 एवढी पटसंख्या आहे. त्यांना जावेद मुल्ला, आनंदा कोळेकर, सुनंदा रेळेकर, अलका पाटील, शोभा सूर्यवंशी, शुभांगी शिंदे हे शिक्षक अध्यापन करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, बौद्धिक व शारीरिक विकासासाठी येथे विविध शालेय तसेच सहशालेय उपक्रम राबविले जातात.

शाळेने गत काही वर्षांपासून यशाची अनेक शिखरे पार केली आहेत. म्हणूनच यंदा स्वच्छ व सुंदर शाळा स्पर्धेत शाळेने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. तसेच जिल्हास्तर स्पर्धेसाठी या शाळेची निवड झाली आहे. सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांनी नटलेल्या या शाळेला गत वर्षी आयएसओ मानांकन हा पुरस्कार देखील मिळाला आहे. सध्या वाठारची प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांना आकर्षित करू लागली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.