तंजावर उलगडणार मराठ्यांचा इतिहास

शिवाजी विद्यापीठाचा लवकरच तंजावरच्या विद्यापीठाशी सामंजस्य करार
कोल्हापूर – तंजावर (तमिळनाडू) येथील तमिळ विद्यापीठ आणि सरस्वती महाल ग्रंथालय यांच्यासमवेत तंजावर पेपर्स आणि तंजावरी मराठी भाषा अभ्यासासंदर्भात सामंजस्य करार करण्याबाबत तमिळ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सी. बालसुब्रम्हण्यम्‌ यांच्याशी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची यशस्वीपणे चर्चा झाली. या संदर्भात कुलगुरू डॉ. शिंदे यांनी नुकतीच विद्यापीठाच्या अभ्यासकांसमवेत तंजावरला भेट दिली.

तंजावर येथील तमिळ विद्यापीठाने मराठा इतिहास आणि मराठी भाषेसंदर्भातील चाळीस हजारहून अधिक कागदपत्रे जतन करून ठेवलेली आहेत. हे विद्यापीठ भाषेला केंद्रस्थानी ठेऊन स्थापन करण्यात आले आहे. त्याचबरोबर सरस्वती महल ग्रंथालयात मोडी कागदपत्रांसह हजारो मराठी ग्रंथांचे जतन केलेले असल्याने संशोधकांना अभ्यासासाठी ते सहज उपलब्ध व्हावे, यासाठी या ग्रंथालयाबरोबरही सामंजस्य करार करण्यात येणार आहे.

त्या दृष्टीने तंजावर येथील सरस्वती महाल ग्रंथालयामध्ये बैठक झाली. याशिवाय शिवाजी विद्यापीठ नवे म्युझिअम साकारत असून या म्युझिअममध्ये तंजावर येथील मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित दालन उभारण्यासंदर्भातही सकारात्मक चर्चा झाली. या बैठका तंजावरचे राजे शिवाजीराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झाल्या.

मराठ्यांच्या इतिहासात तंजावर महत्त्वाचे!
तमिळनाडूतील तंजावर येथे साडेतीनशे वर्षांपूर्वी इ.स. 1676 ला मराठ्यांनी आपले राज्य स्थापन केले. शहाजीराजेंचे पुत्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू व्यंकोजी यांनी हे राज्य स्थापन केले. तेव्हापासून ब्रिटीशांनी 1855 ला संस्थान खालसा करेपर्यंत तेथे मराठा अंमल होता. या जवळजवळ दोनशे वर्षांमध्ये अकरा राजांनी राज्यकारभार केला. मराठ्यांच्या इतिहासात तंजावरचे राज्य हा एक महत्त्वाचा भाग असून तंजावरच्या अभ्यासाशिवाय मराठ्यांचा इतिहास पूर्ण होत नाही. त्यामुळे तंजावर राजघराण्याचे हजारो पेपर्स, इतर ऐतिहासिक कागदपत्रे, वस्तू, शिल्पे, चित्र, शिलालेख, ग्रंथ अभ्यासने हे मराठा इतिहासाच्या अभ्यासात महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर सर्फोजी (दुसरा) यांनी स्थापन केलेले सरस्वती महल ग्रंथालय जागतिक ठेवा ठरले आहे. हे हस्तलिखित ग्रंथांचे जगातील सर्वात मोठे ग्रंथालय असून माणसाच्या लेखन आणि पुस्तक निर्मितीच्या इतिहासाचा दस्तऐवज म्हणून जगभर नावाजलेले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.