स्थायी’ च्या सभेत ऐतिहासिक ‘राडा’

  • वाकडच्या विकासकामांवरून भाजपात कलह
  •  पालिकेच्या साहित्याची तोडफोड

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी असलेल्या भाजपाच्या नगरसेवकांनी “पार्टी विथ डिफरन्स’च्या बिरुदाला खऱ्या अर्थाने आज काळे फासले. भाजपातील अंतर्गत कलहाने आज कळस गाठल्याचे पहावयास मिळाले. वाकडच्या कामाला मिळालेल्या मान्यतेचा राग चिंचवड समर्थकांनी आयुक्तांवर काढला तर याच विषयावरून स्थायीच्या अध्यक्षांनाही कोंडीत पकडत तुफान राडेबाजी केली. काही सदस्यांनी माइक, ग्लाससह प्लेटांची तोडफोड केल्याने सर्वजणच अवाक झाले.

पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर तब्बल सव्वा महिन्यानंतर आज स्थायी समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. सभेला सुरुवात होताच वाकडच्या कामांना राज्य शासनाने मान्यता दिलीच कशी? असा प्रश्‍न चिंचवड आमदारांच्या समर्थकांनी उपस्थित करत खुलाशाची मागणी केली. यावर पुढील आठवड्यात होणाऱ्या सभेत खुलासा करू, असे उत्तर आयुक्तांनी दिले. मात्र त्यावरुन समाधान न झाल्याने चिंचवड विधानसभा मतदारसंघातील चार सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

यानंतर स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे आयुक्तांना खुलासा करण्यासाठी वेळ द्यावा लागेल, अशी भूमिका घेतल्याने या चार सदस्यांनी माइकची तोडफोड करत धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. टेबलवरील ग्लास व नाष्ट्यासाठी देण्यात आलेल्या प्लेटांची तोडफोड केली. यानंतर काही सदस्यांनी नगरसचिव उल्हास जगताप यांनाही धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांना पाचारण करावे लागले. पोलीस आल्याचे लक्षात येताच काही सदस्यांनी गोंधळ आवरता घेतला तर स्थायीच्या अध्यक्षांनीही सभा तहकूब करत असल्याचे जाहीर केले.

यानंतर महापालिकेच्या सुरक्षारक्षकांनी बघ्यांची गर्दी कमी केली. सुमारे तासभर सुरू असलेल्या या प्रकारामुळे भाजपाच्या शिस्तीप्रिय चेहऱ्यामागील “गोंधळी’ चेहरा उघडा पडला. शहरवासियांनी पक्षावर विश्‍वास दाखवित सत्ता हातात दिल्यानंतर या विश्‍वासालाही तडा बसला आहे. सध्या शहरात कोविडसारखी परिस्थिती, रखडलेली विकासकामे, कमी झालेले उत्पन्न, बोकाळलेला भ्रष्टाचार यासारखे महत्त्वाचे प्रश्‍न उभे असताना सदस्यांनी केलेल्या गोंधळामुळे भाजपाच्या प्रतिमेलाही तडा गेला आहे.

वाकडमधील कामांचा वाद

वाकडमधील रस्त्यांची कामे होऊ नयेत, अशी भूमिका चिंचवड विधानसभा मतदारसंघातील स्थायी समितीच्या सदस्यांनी घेतली होती. यानंतर रस्त्यांची दोन कामे दप्तरी दाखल करण्यात आली. मात्र राहुल कलाटे यांनी ही कामे मंजूर करण्यासाठी शासनाकडे दाद मागितली होती. शासनाने या कामांना मंजुरी दिल्यामुळे ज्या सदस्यांनी या कामांना पूर्वी विरोध केला होता त्यांनीच आज गोंधळ घातला. आयुक्तांनी व स्थायी समितीच्या अध्यक्षांनी या कामांबाबत सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे आजचा राडा झाल्याचे काही सदस्यांनी खासगीत बोलताना सांगितले.

‘त्या’ सदस्यांचा ‘यु टर्न’

स्थायी समितीच्या सभेत राडा घालणाऱ्या सदस्यांनी नंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मात्र यु टर्न घेतला. सभेदरम्यान सभापती संतोष लोंढे यांच्यावर आरोप करणाऱ्यांनी त्यांच्याशी वादच झाला नसल्याचे सांगितले. आम्ही बोगस एफडीआर बद्दल खुलासा मागत होतो. आयुक्त खुलासा करत नसल्यामुळे गोंधळ झाल्याचे या सदस्यांनी सांगितले. तसेच 40 टक्‍क्‍यांहून अधिक मायनस येऊन ठेकेदार काम करत असल्यामुळे कामांचा दर्जा घसरत असून काही ठिकाणी कामेच होत नसल्यामुळे आम्ही आयुक्तांना खुलासा मागितल्याचे सदस्य अभिषेक बारणे यांनी सांगितले. सभागृहातील वादाचे आणि सभागृहाबाहेर वादाचे वेगवेगळे सदस्य वेगवेगळी कारणे सांगत असल्यामुळे हा वाद कामांचा नाही तर भाजपातील दोन वरिष्ठ नेत्यांमधील अंतर्गत कलहातून सुरू असल्याचेच समोर आले आहे.

सभागृहात काही मुद्‌द्‌यांवर वाद झाला ही वस्तुस्थिती असून काहीजणांचे गैरसमज झाले असतील ते दूर केले जातील व आजची बाब पक्षश्रेष्ठींसमोर मांडणार आहे. सभागृहामध्ये वाकडमधील रस्त्यांच्या कामांबाबत काही सदस्यांनी खुलासा मागितला होता त्यावर आयुक्तांनी वेळ मागितली. नियमाप्रमाणे आयुक्तांनी वेळ मागितल्यास ती द्यावी लागते. त्यामुळे आपण वेळ दिली. मात्र त्यातून काहीजणांचे समाधान न झाल्यामुळे सभागृहात गोंधळ झाला. अशा पद्धतीने गोंधळ झाल्याने पक्षाची प्रतिमा मलिन होते. तसेच विकासकामेही थांबतात. यापुढे असा प्रकार होऊ नये यासाठी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे तसेच आजच्या प्रकाराबाबत पक्षश्रेष्ठींसमोर वस्तुस्थिती मांडणार आहे.

        संतोष लोंढे, अध्यक्ष , स्थायी समिती

 

आयुक्तांचे हाल ‘बेहाल’

भारतीय जनता पक्षाच्या सदस्य आणि नेत्यांच्या तालावर गेली साडेतीन वर्षे प्रशासनाचा गाडा हाकणारे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आता भाजपालाच नकोसे झाल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. आयुक्तांच्या मागे-पुढे फिरणारे थेट आयुक्तांच्या अंगावर जाण्यापर्यंत मजल मारू लागल्याने आयुक्तांचे हाल “बेहाल’ झाल्याचे आजच्या सभेत दिसून आले. त्यातच काही सदस्यांनी भाजपाला बदनाम करण्यासाठी आयुक्त जाणीवपूर्वक चुकीच्या भूमिका घेत असल्याचे आरोप केल्यामुळे आयुक्त भाजपाच्या “गुडबूक’मधून “बॅडबूक’मध्ये गेल्याचेही स्पष्ट झाले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.