पिंपरी, दि. 18 – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने विकसित केलेल्या गृह योजना प्रकल्पातील प्रत्येक विंगचे नामकरण करण्याचा निर्णय पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) घेतला आहे. पेठ क्रमांक 30 आणि 32 मधील एकूण 792 सदनिकांच्या प्रकल्पातील 55 विंगला गडांची, संतांची आणि नद्यांची नावे देण्यात येणार आहेत. त्यामुळे या गृह प्रकल्पाची पर्यावरणपूरक आणि ऐतिहासिक ओळख निर्माण होणार आहे.
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना माफक दरात घरे घेता यावीत, यासाठी प्राधिकरणाने वाल्हेकरवाडी, चिंचवड येथील पेठ क्रमांक 30 मध्ये गृहयोजना प्रकल्प विकसित केला. त्यामध्ये 25 विंग तयार करण्यात आले आहेत. तर, पेठ क्रमांक 32 मधील गृहयोजना प्रकल्पामध्ये 30 विंग असे एकूण 55 विंग तयार केले आहेत. त्यामध्ये 1 गटात 414 सदनिका व 1 गटात 378 सदनिका अशा एकूण 792 सदनिका बांधून तयार आहेत.
गृहयोजना प्रकल्पातील एकूण 55 विंगला वेगवेगळी नावे देण्याचा निर्णय पीएमआरडीएने घेतला आहे. त्यासाठी गड-किल्ले, संतांची नावे व नद्यांची नावे सुचविण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. ही नावे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुख्य इमारत, तिसरा मजला, आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळ, आकुर्डी, पुणे-411044 या पत्त्यावर 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत पाठवावीत. प्राप्त नावांच्या थीमपैकी सर्वोत्कृष्ट नावांची थीम निवडण्यात येईल. ज्या नागरिकांच्या नावांची थीम निवडण्यात येईल, त्यांना आकर्षक बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती सह आयुक्त बन्सी गवळी यांनी कळविली आहे.
लवकर बुकींग करा
सदनिकांची ऑनलाइन लॉटरी पद्धतीने विक्री करण्याची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याकरीता ऑनलाइन अर्जाची मुदत 21 नोव्हेंबर 2022 पर्यंत देण्यात आली आहे. 22 नव्हेंबर 2022 रोजी सोडत काढण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी ही घरे घेण्यासाठी लवकर अर्ज करावेत, असे आवाहन उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांनी केले आहे.