भोसरीतील घटना : डंपरच्या धडकेत महिलेचा मृत्यू
भोसरी – कामावरून घरी चाललेल्या एका दाम्पत्याच्या दुचाकीला डंपरने धडक दिली. त्यामुळे पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पती जखमी झाला. आपल्या पत्नीचा मृतदेह पाहून पतीचा आक्रोश सुरू होता. तर दुसरीकडे त्यांचा हा आक्रोश कॅमेऱ्यामध्ये टिपणाऱ्यांची अक्षरशः बघ्यांची गर्दी झाली होती. ही ह्रदयद्रावक घटना भोसरी येथे मंगळवारी (दि. 25) दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली.
पल्लवी अरुण किरवे (वय 40) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. तर त्यांचे पती अरुण रामचंद्र किरवे (वय 49, दोघेही सध्या रा. वारजे माळवाडी, पुणे, मूळगाव कासारसाई, ता. मुळशी) हे गंभीर जखमी झाले आहेत.
लॉकडाऊननंतर पल्लवी आणि अरुण या दोघांना सोमवारी भोसरीतील एका पेट्रोल पंपावर काम मिळाल्याने त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. मंगळवारी कामाचा दुसरा दिवस होता. मंगळवारी सकाळी पहिल्या पाळीतील काम संपवून पती-पत्नी दुचाकीवरून आपल्या घरी चालले होते. ते नाशिक फाट्याच्या दिशेने भोसरी उड्डाणपूल संपल्यावर पुढे जात असताना भरधाव वेगात आलेल्या डंपरने किरवे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. डंपरचे चाक अंगावरून गेल्याने पल्लवी यांचा जागीच मृत्यू झाला. तर पती दूरवर फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले.
जखमी अवस्थेतही त्यांनी आपल्या पत्नीचा शोध घेतला. पल्लवी यांचा छिन्न-विच्छन्न अवस्थेतील मृतदेह पाहून अरुण यांनी अक्षरशः हंबरडा फोडला. जमा झालेल्या गर्दीतील काहींनी पोलिसांच्या 100 क्रमांकावर तर काहींनी रुग्णवाहिकेला फोन लावला. पोलिसांचा फोन लागलाच नाही तर रुग्णवाहिकेला फोन केल्यानंतरही दीड तास मदत मिळाली नाही. काही जणांनी अरुण यांचा फोन घेऊन नातेवाइकांना अपघाताबाबत माहिती दिली. अखेर घटनास्थळी दाखल झालेल्या भोसरी पोलिसांनी अरुण यांना खासगी वाहनातून रुग्णालयात उपचारासाठी पाठवून दिले. पोलिसांनी डंपरचालक तानाजी साळुंके (रा. मांजरी बुद्रुक, पुणे) याला ताब्यात घेतले.