शिक्षक, पदवीधर निवडणूक ‘दोन्ही’ पाटलांसाठी प्रतिष्ठेची

महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यात पहिल्यांदाच थेट सामना

पुणे – विधानपरिषदेच्या पुणे विभाग शिक्षक व पदवीधर निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.1) मतदान होत आहे. कधी नव्हे, ती इतकी चुरस यंदा शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये पहायला मिळत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शिवसेना या तीन पक्षांची महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा पहिल्यांदाच थेट सामना या निवडणुकीत रंगला आहे. या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष आहे. मतदारांचा कौल कोणाकडे आहे, या निवडणुकीच्या निकालावरुन दिसून येणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या दोन्ही पाटलांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.

 

 

पदवीधर मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून अरुण लाड, तर भाजपकडून संग्राम देशमुख निवडणुकीच्या रिंगणात आहे. मनसेनेदेखील उमेदवार देत या सामन्यात चुरस निर्माण केली आहे. तर शिक्षक मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून जयंत आसगावकर तर भाजप पुरस्कृत जितेंद्र पवार हे रिंगणात आहेत. यापूर्वी अशा निवडणुकांत प्रामुख्याने शहरी भागातच प्रचाराचा जोर असायचा. यंदा मात्र ग्रामीण भागातही प्रचाराचा धुराळा उडाला आहे. प्रत्येक तालुक्यात प्रचारसभा घेतल्या गेल्या. तसेच मोबाइल, सोशल मीडियातून मेसेज आदींच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला.

 

 

राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आदींनी सभा घेतल्या. तर भाजपच्या उमेदवारांसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आदींच्या सभा झाल्या. मतदार यादीत बोगस नावे असल्याच्या विषयावरून ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. यंदा ही निवडणुक जिंकायचीच या इर्षेने या पक्षांनी प्रचाराची मोहीम राबवली.

 

 

आताच ठरणार 2022 ची गणिते

राज्यात 2022 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. यासाठी इच्छुकांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. त्यामुळे शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निकालावर पुढील राजकीय गणिते अवलंबून आहेत. त्याचबरोबर ज्या पक्षांचे उमेदवार विजयी होतील त्या पक्षांचे संख्याबळ विधानपरिषदेमध्ये वाढणार आहे. पदवीधर मतदारसंघ यंदा खेचून आणायचाच असा चंग महाविकास आघाडीने यंदा बांधला आहे. तर, हा मतदारसंघ आपल्याकडे रहावा, यासाठी भाजप प्रयत्न करत आहे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.