त्यांचे घड्याळ कायमचेच बंद पडणारः स्मृती इराणी 

श्रीगोंदा  – त्यांचं घड्याळ कायमचंच बंद पडणार आहे. ज्यांचं सरकारच येणार नाही, त्यांच्यासाठी लोक मत वाया घालणार नाही.नागवडे व पाचपुते एकत्र येणे हा तालुक्‍यासाठी सुवर्ण योग आहे. श्रीगोंद्यातील जनता हुशार असून ते तोट्याचा व्यवहार न करता भाजपलाच विजयी करतील,असा विश्वास केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी व्यक्त केला.

श्रीगोंद्यात भाजप उमेदवार बबनराव पाचपुते यांच्या प्रचार्थ जाहीर सभेत त्या बोलत होत्या. ना. इराणी म्हणाल्या, पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कशी वागणून दिली, लाठीमार केला हे सर्वांना माहिती आहे. राष्ट्रवादी व कॉंग्रेस राज्यात सत्तेत असताना त्यांनी महाराष्ट्राबरोबर कधी न्याय केला नाही. स्वहितासाठी तिजोरी मोकळी करणे हे त्यांचे कार्य होते.

महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा कळवळा दाखविणारे राहुल गांधी अमेठीत शेतकऱ्याचीच जमीन गिळून बसलेत. कॉंग्रेसला भारतापेक्षा पाकिस्तानची जास्त चिंता असल्याचे कलम 370 वरून लक्षात आले. खा.सुजय विखे म्हणाले, नागवडे पाचपुते कुटुंबीय एकत्र आल्याने श्रीगोंद्याच्या उज्ज्वल भविष्याची सुरवात झाली आहे. या दोघांशिवाय आता तालुक्‍याला कोणाची ही गरज नाही.

नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे म्हणाले, बापूंच्या नावाने समोरचे लोक भाषणे करीत आहेत. बापूंचा वसा आणि वारसा घेऊन समाजकार्यासाठी आम्ही सक्षम आहोत. आमच्यावर बापूंचे संस्कार आहेत. सुजय विखे पाटील यांच्या मध्यस्थीने आपण मुख्यमंत्र्यांना भेटून भाजप प्रवेश केला. यावेळी माजी खासदार दिलीप गांधी, माजी मंत्री सुरेश धस, ज्येष्ठ नेते भगवानराव पाचपुते, प्रा. तुकाराम दरेकर, सदाशिव पाचपुते, बाळासाहेब नाहाटा, दादासाहेब जगताप, बाळासाहेब गिरमकर, ऍड. सुभाष डांगे, संतोष इथापे, नंदू ताडे, संतोष खेतमाळीस आदींची भाषणे झाली.

युवा नेते विक्रमसिंह पाचपुते, माजी सभापती अरुणराव पाचपुते, प्रतिभा पाचपुते, दत्तात्रेय पानसरे, नगराध्यक्षा शुभांगी पोटे, बाळासाहेब महाडिक, उपनगराध्यक्ष अशोक खेंडके, बापूसाहेब गोरे, विठ्ठलराव काकडे, पोपटराव खेतमाळीस, सतीश पोखरणा, दिपक शिंदे, छायाताई गोरे, सीमा गोरे, सुनीता शिंदे, जयश्री कोथिंबीरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन संदिप नागवडे व मिलिंद दरेकर यांनी केले तर आभार मनोहर पोटे यांनी मानले.

समोरचा उमेदवार लपका मारण्यासाठी उभा : पाचपुते
42 वर्षे नागवडे कुटुंबियांशी संघर्ष झाला. मात्र यापुढील संघर्ष आम्ही एकत्रितपणे तालुक्‍याच्या विकासासाठी करू. बापू आज नाहीत मात्र आपला वडीलकीचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी सदैव राहील. माझ्या समोरचा उमेदवार हा लपका मारण्यासाठी उभा आहे. त्यांची तडजोड स्टाइल जनता ओळखून असल्याने आपला विजय निश्‍चित आहे. असे युतीचे उमेदवार बबनराव पाचपुते म्हणाले.

सुरेश धसांचं खुमासदार भाषण गाजलं..
दीडशे दिवस झाले राष्ट्रवादीत आलेल्या शेलारांना उमेदवारी दिली. ही तर त्यांची अवस्था. इथे आल्यावर एकच ऐकायला मिळत आहे वाटोळे झाले वाटोळे झाले. अरे राहुल (जगताप) पाच वर्षे नेमकं काय केलं? तिकिटासाठी शिवसेना व भाजपच्या दारात गेलात. इतक्‍या उड्या कशासाठी. तात्यांच्या (स्व. कुंडलीकराव जगताप) मुलाबद्दल हे घडतंय हे चांगलं नाही. तात्यांची गोष्टच वेगळी होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)