हिंगोली – जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यातील वरखेडा या ठिकाणी शेतकऱ्यांनी आज चक्क पाण्याच्या टाकीवर चढुन शोले स्टाईल आंदोलन केले आहे. अतिवृष्टी, अनुदान निधीमधून सेनगांव तालुक्यातील गोरेगांव, आजेगांव, पुसेगांव, बाभुळगांव ही चार कृषी मंडळे वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांनी मागील काही दिवसापासून गोरेगांव या ठिकाणी सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत करण्यासाठी आंदोलन सुरू केले.
या संतप्त शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी चक्क वरखेडा येथील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले आहे. यावेळी लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. गेल्या 11 दिवसा पासून या शेतकऱ्यांचे हे आंदोलन चालु आहे मात्र प्रशासनाच्या वतीने दखल घेतली जात नसल्यामुळे हे शेतकरी आक्रमक होत रोज नविन प्रकारे आंदोलन करत आहेत, तसेच या आंदोलनामध्ये परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.