हिंगोली : शासनाचा कुटुंब कल्याण शस्त्रक्रियांवर जोर आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणेला टार्गेटही निश्चित करून दिले गेले आहे. मात्र त्या तुलनेत पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत. त्याचाच प्रत्यय कळमनुरी तालुक्याच्या बाळापूर ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी १३ डिसेंबर रोजी आला. येथे ४३ महिलांवर कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र पुरेसे कॉट उपलब्ध नसल्याने या महिलांना शस्त्रक्रियेनंतर ऐन थंडीत जमिनीवरच झोपविण्यात आले. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने आखाडा बाळापूरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांला जाब विचारण्याची तयारी चालवली आहे.
कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया झाल्या नंतर रुग्ण महिलांना कॉटची व्यवस्था करायला पाहिजे. परंतु 13 डिसेंबर रोजी कुटुंब कल्याण योजना शिबिरात महिलांना कडाक्याच्या थंडीत आरोग्य विभागाने चक्क जमिनीवर व्यवस्था केली आहे. ऐन थंडीचे दिवस त्यांत थंडगार फरशीवर महिलांना झोपण्याची व्यवस्था करण्यात आल्याने महिलांतून नाराजीचे सूर दिसून येत आहेत आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. यात महिलांवर कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
शिबिराला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असला तरी रुग्णालय प्रशासनाने मात्र त्यांची व्यवस्था बरोबर केली नाही. यामुळे महिलांना नाईलाजास्तव थंडगार फरशीवरच झोपावे लागले. शस्त्रक्रियेनंतर महिलांना दाटीवाटीने जमिनीवरच झोपविल्याने महिलांच्या नातेवाइकांनी नाराजी व्यक्त केली. डॉ. बोले यांच्या उपस्थितीत हे शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. आखाडा बाळापूरसह परिसरातील अनेक खेड्यांतील महिलांनी यावेळी गर्दी केली.
संबंधितांना जाब विचारला जाईल…
आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी झालेल्या कुटुंबकल्याण शिबिरात महिलांना कॉट दिले होते. त्यानंतर शुक्रवारीही कुटुंबकल्याण शिबीर घेण्यात आले. परंतु कॉट उपलब्ध न झाल्यामुळे गादी, चादर व थंडी वाजू नये म्हणून ब्लॅकेटही दिले होते. कॉट का उपलब्ध झाले नाहीत, याबाबत संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना जाब विचारल जाईल
डॉ कैलास शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी, हिंगोली
अतिशय लाजिरवाणी गोष्ट- खासदार अष्टीकर
ठाकरे गटाचे खासदार नागेश अष्टीकर म्हणाले की, शस्त्रक्रिया केल्यानंतर जर महिलांना जमिनीवर झोपवलं जात असेल तर ती अतिशय धक्कादायक आणि वाईट गोष्ट आहे. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई केली जाईल. अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे.