हिंगोली – सेनगाव तालुक्यातील साखरा, हिवरखेडा, पानकनेरगाव, खडकी, धोतरा, बोरखेडी, केलसुला यासह तालुक्यातील आदी गावामध्ये सोयाबिनवर पिवळ्या मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. हिवरखेडा येथील परिसरातील एकूण सोयाबीन क्षेत्राच्या पन्नास टक्के या रोगाचा हल्ला झाला आहे. उत्पादनात मोठी घट होणार आहे. त्यामुळे पुन्हा बळीराजा संकटात सापडला आहे.
जिल्ह्यात यावेळी मोठा पाऊस होऊन अनेक भागातील पिके पाण्याखाली गेली. त्यानंतर काही पिके शंखी गोगलगायीने व लष्करी अळीने फस्त केली. हे कमी की काय म्हणून, आता ‘यलो मोझॅक’ नामक व्हायरस पिकामध्ये पसरू लागला आहे. या व्हायरसमुळे सोयाबीनच्या पानाच्या मुख्य शिरेजवळ विखुरलेल्या अवस्थेत पिवळ्या रंगाचे पट्टे दिसत आहेत. अशा झाडांना कालांतराने फुले आणि शेंगा कमी लागतात त्यामुळे उत्पन्नात घट होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
सोयाबीनमध्ये 18-20 टक्के तेलाचे आणि 38-40 टक्के प्रथिनांचे प्रमाण आहे. जनावरांसाठी तसेच कुक्कुटपालनासाठी देखील सोयाबीन पेंडीचा पौष्टिक आहार म्हणून उपयोग केला जातो. आंतर पीक, दुबार पीक तसेच पीक फेरपालटीमध्ये सोयाबीन अतिशय महत्त्वाचे पीक आहे. सोयाबीनच्या अधिक उत्पादनासाठी आपल्याला पिकाचे लागवड तंत्रज्ञान, शिफारशीनुसार तणाचा, किडींचा तसेच रोगांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. त्यासाठी सोयाबीन पिकावर येणाऱ्या महत्त्वाच्या रोगांची ओळख असणे देखील गरजेचे आहे.
शासनाने नुकसानभरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी –
‘यलो मोझॅक’ व्हायरसमुळे पानांवरती पिवळे डाग दिसून येतात. साखरा हिवरखेडा या गावातील अनेक शेतकऱ्यांना या विषाणूचा सामना करावा लागत आहे. काही शेतकर्यांचे तर संपूर्ण सोयाबीन वाया गेले आहे. हा प्रादुर्भाव नेमका हिंगोली जिल्ह्यातच का दिसून येत आहे याचे कारण अद्यापही समोर आलेले नाही. या विषाणूचा एकदा पिकावर शिरकाव झाला की तो आटोक्यात येत नाही. त्यामुळे अनेकांनी सोयाबीनची वेळेआधीच कापणी करून बांधावरती ढीग घातलेत. झालेल्या नुकसानीची पाहणी करून लवकरात लवकर शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
पांढरी माशी किडीद्वारे प्रसार –
सोयाबीन हे राज्यातील कोरडवाहू क्षेत्रातील महत्त्वाचे नगदी पीक असून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था प्रामुख्याने या पिकावर अवलंबून आहे. मागील काही वर्षात सोयाबीन पिकाच्या क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. सध्या पिवळा मोझॅक या रोगाचा सोयाबीन पिकावर प्रादुर्भाव पीक वाढीच्या कालावधीमध्ये आढळून आला आहे. पिवळा मोझॅक हा रोग विषाणूजन्य रोग असून याचा प्रसार पांढरी माशी या किडीद्वारे होतो. रोगट झाडांच्या पानांचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर दिसून येतो. झाडांच्या शेंड्यावरील पाने पिवळी पडून आकाराने लहान जन्म घेतात.
प्रादुर्भावाची कारणे आणि प्रसार कसा होतो-
हा रोग मुंगबीन यलो मोझॅक या विषाणूंमुळे उद्भवतो. सोयाबीनच्या उभ्या पिकातील विषाणूग्रस्त झाडांपासून पांढरी माशी या किडीद्वारे या रोगाचा प्रसार होतो. या रोगाचा विषाणू केवळ कडधान्य पिकांवर येत असल्याने बिगर मोसमी हंगामात मूग, उडीद, वाल, चवळी, घेवडा इत्यादी पर्यायी पिकांवर तो जिवंत राहून सोयाबीन पिकावर संक्रमित होते.
या रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी, खराब झाडे उपटावीत, चिकट पिवळे सापळे लावावेत, Thimethoxam ची फवारणी उशिरा येणाऱ्या सोयाबीनच्या वाना मध्ये करावी. -राजेश भालेराव (शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र तोंडापुर)
शेतकऱ्यांवर नेहमीच अस्मानी संकटे येतात पेरणी केली तेव्हा पासून सोयाबीन पिकांवर संकटे आले आहे. अतिवृष्टीमुळे पिके पाण्याखाली गेले आणि आणि सोयाबीन पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव व आत्ता मौझ्यक व्ह्ययलर चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. पहिलेच तर अतिवृष्टीमुळे पिके पाण्यात गेली त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. तीच नुकसान भरपाई अद्यापही मिळालेली नाही. अतिवृष्टीचे अनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे व कृषी विभागाच्या वतीने यलो मॉझ्यक व्ह्ययलर मुळे जे नुकसान झाले आहे त्याचे तत्काळ पंचनामे करावे व नुकसान भरपाई देण्यात यावी. – शेतकरी, शिवशंकर निरगुडे