हिंगोली – राज्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ करून सातबारा कोरा करावा यासह इतर मागण्यांसाठी हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी मानखुर्द ते मंत्रालय असे २० किलोमीटर अर्धनग्न पायी चालून मंत्रालयासमोर आंदोलन करणार आहेत. त्यासाठी मंगळवारी (ता. ११) हिंगोलीत आंदोलन करून शेतकरी मुंबईकडे रवाना झाले आहेत.
राज्यातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सरकार स्थापन झाल्यानंतर महायुतीला आश्वासनांचा विसर पडला आहे. सरकारने संपूर्ण कर्जमाफी बाबत अद्याप पर्यंत कुठलाही निर्णय घेतला नसल्याने कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरुच आहेत.
दरम्यान, शेतकऱ्यांचे कर्जमाफ करून सातबारा कोरा करावा, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने पिकविमा द्यावा, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे सुरु करावीत, वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, यासह इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याबाबत शासनाकडे निवेदनही सादर केले होते. मात्र कर्जमाफी बाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याने शेतकऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करून शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
यावेळी नामदेव पतंगे, गजानन कावरखे, दीपक सावके, प्रविण मते, राजेश मते, गजानन जाधव, शांतीराम सावके, दीपक सावके, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. त्यानंतर शेतकरी वाहनाने मानखुर्द येथे रवाना झाले असून मानखुर्द ते मंत्रालय असा २० किलो मिटरचा प्रवास अर्धनग्न अवस्थेत केला जाणार आहे. त्यानंतर मंत्रालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले जाणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.