हिंगोली (प्रतिनिधी) : हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील दूघाळा तांडा शेत शिवारामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका शेतातून तीन लाख रुपये किमतीची गांजाची 61 झाडे जप्त केली आहेत. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि. 27) रात्री गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील दुघाळा तांडा शेत शिवारामध्ये एका शेतात गांजाची झाडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यावरून पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, उपनिरीक्षक सुनील गोपीणवार, जमादार सुनील आंभोरे, राजु ठाकूर, प्रशांत वाघमारे, किशोर सावंत, संभाजी लकूले, नितीन गोरे, शेख जावेद, ज्ञानेश्वर सावळे, आकाश टापरे यांच्या पथकाने दुघाळा तांडा शिवारात शोध मोहीम सुरू केली होती.
दरम्यान, यामध्ये विष्णू शंकर जाधव या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गांजाची झाडे आढळून आली असून त्याची किंमत सुमारे तीन लाख रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या तक्रारीवरून औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात शेतकरी विष्णू जाधव यांच्या विरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे