हिंगोली (प्रतिनिधी) : सेनगांव तालुक्यातील आजेगांव येथील अष्टविनायक बाल गणेश मंडळाने मागील 17 वर्षाची परंपरा कायम ठेवत यावर्षीही विविध जनजागृतीपर कार्यक्रमाच्या माध्यमातून व आकर्षक देखाव्यातून जिल्ह्यात एक नावलौकिक प्राप्त केले आहे.
आजेगांव येथील कुंभार गल्लीत अनेक वर्षाची पारंपरिक पद्धत जपत कोरोना संक्रमण काळाचे दोन वर्षे वगळता दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी विविध जनजागृतीचे कार्यक्रम राबवून नागरिकांना मंत्रमुग्ध केले जात आहे. या वर्षी अष्टविनायक बाल गणेश मंडळाच्या वतीने संपूर्ण गांवामध्ये ‘बेटी बचाव-बेटी पढाव’, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, विविध जनजागृतीपर कार्यक्रम, आरोग्य विषयक उपक्रम यासह विविध प्रकारचे बॅनर होर्डिंग्ज, पोस्टर गावातील चौकाचौकामध्ये लावण्यात आले आहेत.
या गणेश मंडळांने अशाच प्रकारचे स्तुत्य उपक्रम राबवल्यामुळे 2013 मध्ये त्यांना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे यांच्या हस्ते पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे.
गांवात मुलीचा जन्म झाल्यास मातेचा सन्मान करून बक्षीस
तसेच या गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सव काळात आजेगांवात कोणत्याही व्यक्तीच्या घरी मुलीचा जन्म झाल्यास त्या मातेला साडी-चोळी देवून सत्कार करून रोख रक्कम 111 रुपये बक्षीस देण्यात येते.
शिवनेरी किल्ल्याची साकारली प्रतिकृती
आजेगांव येथील अष्टविनायक बाल गणेश मंडळाच्या वतीने यावर्षी शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती साकारून व आकर्षक देखावा निर्माण करून त्यामध्ये बालगणेशाची स्थापना केली आहे. अशा या उत्कृष्ट देखाव्यामुळे व आपल्या जनजागृतीपर उपक्रमाच्या माध्यमातून अष्टविनायक बाल गणेश मंडळाने जिल्ह्यात एक नावलौकिक प्राप्त केले आहे.