हिंगोली – केंद्र सरकारकडून सुरु असलेला केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर, वाढती महागाई, बेरोजगारी, सरकारची चुकीची धोरणे याविरोधात आज देशभरात काॅंग्रेसकडून आंदोलन सुरु आहे. या दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात आमदार डाॅ. प्रज्ञा सातव यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले.
शहरातील महात्मा गांधी चौकतून इंधन दरवाढीच्या निषेधार्थ हातगाड्यामध्ये दुचाकी ठेवून हातगाडा ओढण्यात आला. तसेच गॅस सिलेंडर डोक्यावर घेऊन जिल्हाअधिकारी कार्यालयपर्यन्त मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
केंद्रातील भाजप सरकारच्या मनमानी कारभारामुळे महागाईने कळस गाठला असतांना जिवनावश्यक वस्तूंवरही जीएसटी लावून मोदी सरकारने सर्व सामान्य जनतेला देशीधडीला लावले आहे. देशात बेरोजगारीनेही कळस गाठलाय, तरुण वर्गाचे भवितव्य अंधारात आहे. महागाई बेरोजगारी व ढासळत्या अर्थव्यवस्थेला केंद्र सरकारची चुकीची धोरणे कारणीभूत असल्याचे आरोप यावेळी करण्यात आले आहे.
यावेळी काॅंग्रेस कार्यकर्ते दिलीप देसाई, अनिल नेणवाणी, सुरेश सराफ, कॉंग्रेस प्रवक्ते विलास गोर, शामराव जगपात, केशव नाईक, शेख नेहाल, यांसह आदी कॉंग्रेस पदधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सेनगांव तालुका काँग्रेसच्या वतीनेही तहसीलवर केंद्रासमोर आंदोलन करत केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. तसेच सेनगांव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.