नागपूर : हिंगणघाटमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणीला पेट्रोल टाकून ठार मारण्याची घटना नुकतीच घडली आहे. या तरुणीच्या मृत्यूनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या पीडितेला त्वरीत न्याय मिळावा आणि आरोपी विकेश नगराळे याला फासावर लटकवण्यात यावे अशी मागणी या मुलीच्या मृत्यूनंतर होत आहे. राज्य सरकारने देखील हा खटला जलद गतीने चालवण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, या प्रकरणामध्ये आता आरोपी विकेश नगराळेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा होती. नागपूरच्या कारागृहात विकेशने हा प्रयत्न केल्याचं म्हटलं जात होतं. पण पोलीस प्रशासनाने हे वृत्त फेटाळलं आहे. तत्पूर्वी, पीडितेचा मृत्यू झाल्याचे विक्की नगराळेला सांगण्यात आल्यानंतर त्याने माझ्यामुळे सर्वांना त्रास होत असल्याने मला गोळ्या झाडून मारुन टाका, अशी मागणीही केली होती.