मुंबई : एकतर्फी प्रेमातून वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे प्राध्यापक तरूणीवर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याच्या घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणातील दोषीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांनी योग्य तपास करावा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.
समाजमन सुन्न करणारी घटना हिंगणघाट येथे सोमवारी घडली. एका विवाहीत तरूणाने भररस्त्यात प्राध्यापक तरूणीला जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ही तरूणी 40 टक्के होरपळली असून चेहरा पूर्ण जळाल्याने तिला वाचा आणि डोळे कायमचे गमवावे लागण्याची भीती आहे.
पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेची दखल घेत सोमवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायालयात करण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच बलात्कारासंदर्भात आंध्रप्रदेशच्या धर्तीवर कायदा करण्यासाठी आपण आंध्रप्रदेशच्या गृहमंत्र्यांना जाउन भेटणार आहोत व कायद्याची माहिती घेणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.
गृहमंत्र्यांपाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दोषीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी या प्रकरणाचा तपास योग्यरीतीने करण्याचे निर्देश दिले. तसेच भाजलेल्या जखमी तरुणीवर योग्य ते उपचार करावेत. या उपचारांचा खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून करण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.