नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी यापूर्वी जयपूरमधील महागाई हटाओ रॅलीमध्ये हिंदू विरुद्ध हिंदुत्व या मुद्द्यावरून भाजपा सरकारला घेरले होते. त्यांनी सरकार आणि कथित हिंदुत्ववाद्यांवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी नाव न घेता प्रत्युत्तर दिले आहे.
हिंदू आणि हिंदुत्व या दोन वेगळ्या कल्पना नाहीत. ते समान आहेत. या विषयावर विनाकारण वाद निर्माण करणे म्हणजे गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असे भैय्याजी जोशी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींवर टीका करताना राहुल गांधींनी, हिंदुत्ववादी गंगेत एकटाच स्नान करतो. हिंदू करोडो लोकांसह गंगेत स्नान करतात. एक बाजू हिंदू, तर दुसरी बाजू हिंदुत्ववादी. एक बाजू खरी, दुसरी बाजू खोटी. हिंदू खरे बोलतात, हिंदुत्ववादी खोटे बोलतात, असे वक्तव्य केले होते.
पंतप्रधान मोदींनी गेल्या आठवड्यात काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन करताना गंगेत स्नान केले होते त्या अनुशंगाने त्यांनी ही टीका केली होती.