नवी दिल्ली : कॅनडातील ब्रॅम्प्टन येथे 4 नोव्हेंबर रोजी एका हिंदू मंदिरावर हल्ला झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ हिंदू शीख ग्लोबल फोरमच्या कार्यकर्त्यांनी रविवारी (10 नोव्हेंबर) दिल्लीतील कॅनडाच्या दूतावासावर निषेध मोर्चा काढला. आंदोलकांमध्ये महिलाही सहभागी झाल्या होत्या. त्यांच्यामध्ये अनेक वृद्ध लोक होते.
हिंदू संघटना आणि मंचाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मंदिरावरील हल्ल्याचा निषेध केला. ‘हिंदू आणि शीख एकत्र आहेत’ आणि ‘भारतीय लोक कॅनडातील मंदिरांची विटंबना सहन करणार नाहीत’ असे फलक घेऊन आंदोलक पोहोचले. आंदोलकांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी दूतावासाबाहेर बॅरिकेड्स लावले आणि अनेक पोलिस कर्मचारी तैनात केले.
पोलिसांनी दूतावासासमोरील तीन मूर्ती मार्गावर बॅरिकेडिंग करून आंदोलकांना रोखले. मात्र लोकांनी बॅरिकेड्स तोडले. यानंतर पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले. त्याचवेळी हिंदू मंदिरावरील हल्ल्याप्रकरणी कॅनडाच्या पोलिसांनी चार जणांना अटक केली. यामध्ये शीख फॉर जस्टिस (एसएफजे) चे नेते कार्यकर्ते इंद्रजीत गोसल यांनाही पकडण्यात आले होते, परंतु नंतर त्यांची सुटका करण्यात आली. सिख फॉर जस्टिस या संघटनेवर भारतात बंदी आहे.