नवी दिल्ली : छत्तीसगडमधील रायपूर येथील रहिवासी असलेले प्रख्यात हिंदी कवी आणि कथाकार विनोद कुमार शुक्ल यांना या वर्षीचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आज नवी दिल्लीतील ज्ञानपीठ निवड समितीने याची घोषणा केली. पहिल्यांदाच छत्तीसगडमधील एका लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे.
१ जानेवारी १९३७ रोजी राजनांदगाव येथे जन्मलेले विनोद कुमार शुक्ल गेल्या ५० वर्षांपासून लिहित आहेत. विनोद कुमार शुक्ल यांचा पहिला काव्यसंग्रह अभिषेक जय हिंद १९७१ मध्ये प्रकाशित झाला. त्यांचे कथासंग्रह रूम ऑन अ ट्री आणि कॉलेज हेदेखील खूप लोकप्रिय आहेत. विनोद शुक्ल यांच्या नौकर की कमीज, इफ इट ब्लूम्स वी विल सी, देअर युज्ड टू बी अ विंडो इन द वॉल या कादंबऱ्या सर्वोत्तम कादंबऱ्यांपैकी एक आहेत. प्रसिद्ध चित्रपट निर्माते मणि कौल यांनी त्यांच्या नौकर की कमीज या कादंबरीवर एक चित्रपटही बनवला होता.
विनोद कुमार शुक्ल यांना कविता आणि कादंबरी लेखनासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे, गजानन माधव मुक्तिबोध फेलोशिप, रझा पुरस्कार, वीरसिंह देव पुरस्कार, सृजनभारती पुरस्कार, रघुवीर सहाय स्मृती पुरस्कार, दयावती मोदी कवी शिखर पुरस्कार, भवानीप्रसाद मिश्र पुरस्कार, मैथिलीशरण गुप्त पुरस्कार, पंडित सुंदरलाल शर्मा पुरस्कार आदी पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
अलीकडच्या काळात त्यांना मातृभूमी बुक ऑफ द इयर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. गेल्या वर्षीच, त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील नाबोकोव्ह पुरस्काराने सन्मानित केले. हा सन्मान मिळवणारे ते आशियातील पहिले साहित्यिक आहेत.