नवी दिल्ली – भाषेच्या मुद्द्यावरून सध्या तमिळनाडूतील वातावरण तापले आहे. त्या पार्श्वभूमीवर, राजकारणासाठी आणि भ्रष्टाचार दडवण्यासाठी विरोधकांनी भाषेचा वाद पेटवला, असे टीकास्त्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी राज्यसभेत सोडले. त्यांच्या निशाण्यावर प्रामुख्याने तमिळनाडूतील सत्तारूढ आघाडीचे नेतृत्व करणारा द्रमुक हा पक्ष होता.
राष्ट्रीय शिक्षण धोरणातील त्रिभाषा सुत्राला तमिळनाडूतून विरोध दर्शवला जात आहे. त्यामुळे तमिळनाडू सरकार विरूद्ध केंद्र सरकार असा संघर्ष सुरू झाल्याचे चित्र पुढे आले आहे. तो धागा पकडून शहा यांनी भूमिका मांडली.
भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी भाजप वचनबद्ध आहे. मी स्वत: आगामी काळात सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, खासदार आणि सामान्य जनतेशी त्यांच्या भाषांमध्ये पत्रव्यवहार करणार आहे. भाषेच्या नावाखाली देशात विभाजनाला खतपाणी मिळाले. ते आता घडू नये. हिंदीची इतर भाषांशी स्पर्धा नाही. इतर भाषांची हिंदी सखीच आहे. देशासाठी प्रत्येक भाषा संपत्तीच आहे. केंद्र सरकार दाक्षिणात्य भाषांविरोधात असल्याचा आरोप काही जण करतात. ते कसे शक्य आहे? मी गुजरातचा आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन तमिळनाडूच्या आहेत, असे त्यांनी नमूद केले.