नवी दिल्ली – हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेचे काम थांबणे ही काही उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांच्या समुहाला मिळालेली क्लीन चिट नाही, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसने दिली. हिंडेनबर्गने जानेवारी २०२३ मध्ये एक अहवाल जारी केला. त्यामध्ये अदानी समुहावर गंभीर आरोप करण्यात आले. त्याचा मोठा आर्थिक फटका अदानी समुहाला बसला. अर्थात, संबंधित आरोप त्या समुहाने फेटाळले होते.
आता हिंडेनबर्गचे काम थांबणार असल्याच्या घडामोडीवर प्रतिक्रिया देत कॉंग्रेसने पुन्हा एकदा अदानींवर जोरदार निशाणा साधला. त्याविषयीचे निवेदन पक्षाचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी जारी केले. हिंडेनबर्गच्या अहवालाची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने आरोपांच्या चौकशीसाठी तज्ञांची समिती स्थापन केली. अर्थात, हिंडेनबर्ग अहवालात अदानींच्या महाघोटाळ्यातील केवळ काही भागावरच प्रकाश टाकण्यात आला होता.
अदानी समुहाला संरक्षण देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कॉंग्रेसच्या वतीने त्या महाघोटाळ्याविषयी १०० प्रश्न विचारण्यात आले होते. त्यातील केवळ २१ प्रश्न हिंडेनबर्ग अहवालाशी संबंधित होते, असे रमेश यांनी म्हटले. कॉंग्रेसने सातत्याने अदानी समुहाला घेरताना मोदींनाही लक्ष्य करण्याची रणनीती अवलंबली आहे.