तळेगाव दाभाडे – तीन महिन्यांपूर्वी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या येथील हिंदमाता रेल्वे भुयारी पुलामध्ये मंगळवारी (दि. 24) भल्या पहाटे झालेल्या जोरदार पावसाचे पुलाचा मार्ग बंद झाला आहे. पावसाळ्यात आतापर्यंत सहावेळा या पुलाची वाहतूक बंद झाली. या रेल्वे भुयारी मार्गाला स्वीमिंग पुलाचे स्वरूप आले आहे. या पूलमध्ये साचणाऱ्या पाण्याचा कायमचा निचरा करण्याची मागणी नागरिकांनी केली.
तळेगाव दाभाडे स्टेशन चौकातील सततची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तसेच तळेगाव दाभाडे-चाकण राष्ट्रीय मार्ग ते नगरपरिषदेचा जवळचा मार्ग करण्यासाठी 10 कोटी 31 लाख रुपयांच्या निधीतून हिंदमाता रेल्वे भूयारी पूल उभारण्यात आला. त्या पुलाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. मंगळवारी (दि. 24) पहाटे जोरदार पावसाने या पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे भूयारी मार्गातून होणारी वाहतूक थांबली.
या पुलामध्ये साचणाऱ्या पाण्याचा कायमचा निचरा करून पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी नगरसेवक गणेश काकडे, उद्योजक संतोष खांडगे, सोमा भेगडे, आशिष खांडगे, मिलिंद शेलार, मिलिंद अच्युत, सुहास गरुड आदी नागरिकांनी केली.