Heena Khan | अभिनेत्री हिना खान कॅन्सरशी झुंज देत आहे. कॅन्सरचे निदान झाल्यानंतर सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. या उपचारादरम्यान तिला बऱ्याच गोष्टींचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र ती प्रत्येक अडचणीचा मोठ्या हिमतीने सामना करत आहे. हिना चाहत्यांना तिच्या उपचारांबाबत माहिती देत असते. नुकतेच तिने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हिना खानने 6 डिसेंबर रोजी तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर रुग्णालयातील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये हिना खान रुग्णांच्या कपड्यात दिसत आहे. खरं म्हणजे तिचा हा पाठमोरा फोटो आहे. या फोटोत तिचा चेहरा दिसत नाही. हिना खानने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये एक प्लास्टिकची पिशवी आहे. दुसऱ्या हातात दोन प्लास्टिकच्या डब्यासारखे वैद्यकीय उपकरण दिसत आहे. प्लास्टिकची बॅग आणि दोन प्लास्टिकचे डबे घेऊन हिना खान रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जाताना दिसते.
View this post on Instagram
या फोटोसोबत तिने सकारात्मक, आशावादी कॅप्शन देत उपचारांच्या कॉरिडॉरमधून मी आयुष्याच्या प्रकाशमय दिशेने जात आहे. एक एक पाऊल टाकत हा माझा प्रवास चालू आहे. मी कृतज्ञ आहे. माझ्या प्रार्थना करा, अशा आशयाचं कॅप्शन तिने दिले आहे. या पोस्टनंतर अनेकजण तिला कमेंट करत धीर देत आहेत.
दरम्यान, २८ जूनला हीना खानने तिच्या इन्स्टाग्राम हॅण्डलवर तिला कर्करोगाचे निदान झाल्याचे एक पोस्ट शेअर करीत सांगितले होते. मात्र या आजाराशी झुंज देतानाही ती आत्मविश्वासाने रॅम्प वॉक करताना दिसली. तिचे फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.
हिना खान ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेद्वारे घराघरां पोहोचली आहे. ‘बिग बॉस’च्या ११ व्या सीझनमध्ये ती टॉप २ मध्ये पोहोचली होती. ‘खतरों के खिलाडी’ या शोमध्ये देखील ती सहभागी झाली होती.