नवी दिल्ली/ शिमला – हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचा विजय झाला आहे. पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी राज्याचे नेतृत्व कोणी करावे याबाबत पक्षात अद्याप स्पष्टता नसल्यामुळे एकमत होऊ शकलेले नाही. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याकडूनच नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
हिमाचलच्या प्रचारात प्रियंका गांधी वड्रा सक्रिय होत्या. निवडणुकीत मिळालेल्या विजयाचे श्रेय त्यांना दिले जाते आहे. काही इच्छूकांनीच तसे म्हटले आहे. त्यामुळे प्रियंका आता कोणाच्या नावाची घोषणा करतात याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
कालच कॉंग्रेसच्या सर्व 40 नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली होती. त्यात नेता निवडीचे सर्वाधिकार हाय कमांडला देण्याचा एक ओळीचा ठराव संमत करण्यात आला. त्यामुळे हिमाचलचा चेंडू आता दिल्लीकडे टोलवला गेला आहे.
Loksabha : अधिररंजन चौधरींचे लोकसभेत नोटाबंदीवर टीकास्त्र, म्हणाले “नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेचे…”
मल्लिकार्जुन खर्गे जरी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असले तरी गांधी कुटुंब ज्या नावावर बोट ठेवेल त्याच नावाची वर्णी लागणार असल्याचे उघड आहे. प्रियंका गांधी किंवा खर्गे यांच्याकडून नेत्याच्या नावाची घोषणा केली जाईल आणि ती रविवारी केली जाईल असे पक्षातील सूत्रांनी सांगितले.