सिमला – बर्फवृष्टीमुळे रोहतांग खिंडीतील अटल बोगद्याच्या दक्षिण पोर्टलजवळ 400 हून अधिक वाहनांमध्ये अडकलेल्या पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. गुरुवारी मनाली-लेह महामार्गावरील या बोगद्यावर आणि आजूबाजूच्या परिसरात बर्फवृष्टी झाल्यानंतर तेथे ही वाहने व त्यातील पर्यटक अडकले होते.
त्यांना बाहेर काढण्यासाठी केलॉन्ग आणि मनाली येथील पोलिस पथकांनी संयुक्तपणे बचाव मोहीम सुरू केली, सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी 10 ते 12 तास लागले आणि शुक्रवारी पहाटे 4 च्या सुमारास हे बचाव कार्य संपले.
खराब हवामानामुळे धडकलेली सर्व वाहने सुरक्षितपणे दक्षिण पोर्टलच्या बाहेर आली आहेत. अडकलेल्या पर्यटकांसाठी आणि स्थानिकांसाठी प्रशासनाकडून जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. नवीन वर्ष साजरे करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक कुल्लू आणि मनाली येथे गर्दी करत आहेत आणि बर्फवृष्टीनंतर त्यांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे.
जयस्तंभ अभिवादन सोहळा : पुणे-अहमदनगर महामार्गावरील वाहतुकीत बदल; वाहनतळांची जागाही निश्चित
वाढत्या पर्यटकांमुळे त्या भागातील रस्त्यांवर वाहतुक कोंडीही वारंवार होत आहे. चंबा जिल्ह्यातील डलहौसी, सलोनी आणि चुरा भागात तसेच पांगी खोऱ्यात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे या भागाचा राज्याच्या इतर भागाशी असलेला संपर्क तुटला आहे.